वडारांचा आरक्षणासाठी एल्गार, आझाद मैदानावर “अर्धनग्न हतोडा आंदोलन” – ३१ ऑगस्ट नंतर आंदोलन तीव्र व आक्रमक करण्याचा ईशारा
वडारांचा आरक्षणासाठी एल्गार ,आझाद मैदानावर “अर्धनग्न हतोडा आंदोलन”
३१ ऑगस्ट नंतर आंदोलन तीव्र व आक्रमक करण्याचा ईशारा
मुंबई: सामाजिक न्यायापासून वंचित, उपेक्षित वडार समाजाकडून आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेऊन सोमवारी (दि.१९ ऑगस्ट) मुंबईत आझाद मैदानात “अर्धनग्न हातोडा आंदोलन” करण्यात आले.
राज्य व राष्ट्राच्या विकासाचे गणक असणारे दळणवळणाचे रस्ते, सिंचनाची धरणे, टोलेजंग प्रशासकीय ईमारती उभारून देश व राज्याच्या प्रगतीत आपल्या घामाने महत्वाची भूमिका बजावणाऱ्या वडार समाजाकडे स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतरही सामाजिक न्याय मिळाला नाही. शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या प्रचंड दुर्लक्षामुळे वडार समाज सामाजिक न्यायापासून उपेक्षित आहे. यंत्रयुगात वडार समाजाचा रोजगार बुडाला असून उपासमारीची वेळ आली आहे. शासनदरबारी सामाजिक आरक्षण नसल्याने समाजात शिक्षणाचे अत्यल्प प्रमाण व परिणामी अंधश्रद्धा व व्यसनी झालेल्या वडार समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून शाश्वत आरक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे, अशी मागणी यावेळी बोलताना डॉ श्रवण रॅपनवाड यांनी केली.
मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातुर आणि सोलापूर येथील दोन्ही वडार मेळाव्यात भरभरून घोषणा केल्या.पण अमलबजावणी शून्यच!वडार समाजाने पुन्हा निवडणूक पार्श्वभूमीवर आपली फसवणूक थांबवून अनुसूचित जमातीचे आरक्षणाची शिफारस केंद्र सरकारकडे करावी, असे ते यावेळी बोलताना म्हणाले. १००कोटींचा निधी आणि समाजातील लोकांना घरकुल आशा दिलेल्या आश्वासनांची पूर्तता मुख्यमंत्री फडणवीस यांनी करावी, या मागण्यासाठी सर्व संघटना एकत्र येऊन सोमवारी दि. १९ आॅगस्ट १९ रोजी मुंबईत आझाद मैदानात आगळे वेगळे अर्धनग्न अवस्थेत “हातोडी आंदोलन” करण्यात आले. यावेळी “वडारांना न्याय द्या,” “घोषणांची अंमलबजावणी करा” “मुख्यमंत्री जागे व्हा” “वडारांची हाय घेऊ नका ” अशा आक्रोशाने परिसर दुमदुमत होता. या आंदोलनात राज्यभरातील वडार प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात सामिल झाले होते.या आंदोलनात डॉ. श्रावण रॅपनवाड, मुकुंदराव पवार,सुभाष गुजर, बालाजी पवार,भाऊलाल पवार,संजय देवकर, रमेश जेठे,राम देवकर, रमेश शिंदे, वसंतराव शिंदे, विलासराव पवार , नगरसेवक केशव मुद्देवाड, निळकंठ वर्षैवाड,संपत गायकवाड, किरण धोत्रे,बापुराव लष्कर, शाहीर गंगाराम नलावडे आदिंसह सर्व संघटना नेत्यांनी आक्रमक व अभ्यासपूर्ण भूमिका आपल्या वक्तव्यातून मांडली. महाराष्ट्र भरातील युवकांचा रोष व उत्साह पाहता वडार समाज आरक्षणासाठी वेगळा मार्ग स्वीकारला तर सरकार जबाबदार राहील असे ठणकावून सांगितले.
निवेदनात भटके विमुक्त मुक्तीदिन अर्थात ३१ आॅगस्ट पर्यंत मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारला वेळ दिला आहे. निवेदनावर सर्व वडार नेत्यांसह शेकडो वडार प्रतिनिधींचे स्वाक्षऱ्या आहेत . कामगारमंत्री मदन येरावार यांनी वडार समाज शिष्टमंडळाची भेट घेतली. सरकार सहानुभूतीपूर्वक सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.