Maharashtra GovPoliceमुंबई

उद्धव ठाकरेंची मागणी मान्य ; ‘हॉटस्पॉट’ मुंबईत केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात

मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी मुंबई पोलिसांना शहरात तैनात केले आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात लष्कर बोलवणार असल्याचे वावडे उडले होते. त्यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लष्कर बोलवणार नसून राज्यातील पोलिसांना आराम देण्यासाठी केंद्र सुरक्षा दलाच्या तुकड्या बोलवणार असल्याचे संकेत दिले होते.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मुंबई पोलीस शहरात बंदोबस्तासाठी तैनात आहेत. हा लॉकडाऊन आणि कोरोनाग्रस्तांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे त्यांना विश्रांतीची गरज होती. म्हणून राज्य सरकारने केंद्राकडे सुरक्षा दलाच्या जवानांची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने सीआरपीएफ आणि सीआयएसएफच्या तुकड्या महाराष्ट्रात पाठवल्या आहेत. हे जवान काल मुंबईत दाखल झाल्यानंतर आजपासून त्यांना शहराच्या विविध भागांत तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांना आता थोडी विश्रांती मिळेल, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद ही शहरं सध्या रेड झोनमध्ये आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सुमारे १२०० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यापैकी मुंबईत ६०० जणांचा समावेश आहे. तर १२ जणांनी जीवदेखील गमावला आहे. अशातच सलग दोन महिने अविरत काम केल्याने पोलीस अधिकारी, कर्मचारी तणावाखाली आहेत. त्यांना काही काळ आराम देऊन पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी आता केंद्राचे सुरक्षा दल महाराष्ट्र पोलिसांसोबत काम करणार आहेत. पुणे शहरात काही दिवसांपूर्वीच रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे. त्यासोबतच नाशिक, अमरावती, औरंगाबादमध्येही तुकड्या तैनात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button