आघाडीत पुन्हा नाराजी नाट्य, तर दिवाळीनंतर आघाडीचे दिवाळे काढण्याचा भाजपचा प्लॅन
मुंबई : कुठल्याही नियुक्त्या अथवा अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना घटक पक्षांना विचारात घेऊनच निर्णय घेण्यात यावा असे महाविकास आघाडीत ठरले आहे. मात्र आता आघाडीत एक नवा वाद पुढे आला आहे. महामंडळाच वाटप अजूनही प्रलंबित असताना ऊर्जा खात्यातील संबंधित पारेषण, निर्मिती या कंपन्यांमधील संचालक मंडळावर अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ऊर्जा मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी या नेमणुका केल्या आहेत. मात्र राऊत यांनी केलेल्या नेमणुकांचा राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे.
महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीत नियुक्त्यांवरून पुन्हा नाराजी नाट्य सुरु झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षाच्यावतीने केलेल्या नियुक्तीवरून राष्ट्रवादी आणि सेनेत नाराजी असल्याचं बोललं जात आहे.
आघाडीतील घटक पक्षांशी विचारविनिमय न करता नेमणूक केल्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादीत नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे विचारात न घेता केलेल्या नेमणुका रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. याआधी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या राष्ट्रवादीच्या खात्यातील मंत्री अनिल देशमुख यांनी केल्या होत्या. त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. त्यामुळे आता काँग्रेसच्या मंत्र्यांनी कोणालाही विश्वासात न घेता बदल्या केल्याने नाराजी पसरली आहे. यावर आता हे तिन्ही पक्ष कुठली भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
तर दुसरीकडे, महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यामुळे सर्वाधिक जणमतं असतानाही भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. त्यामुळे सेनेवर नाराज असलेला भाजप आता महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडीचे दिवाळीनंतर दिवाळे काढण्याचा प्लॅन भारतीय जनता पक्षाकडून आखण्यात आला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये सत्तापालट करण्याकरिता भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनिशी तयार होत आहे, अशी माहिती पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.
सध्या कोरोनाचे संकट असल्याने भारतीय जनता पक्षाला सत्तांतरण करण्यात रस नाही. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा मुहूर्त निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटक त्यानंतर मध्यप्रदेश आणि आता राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तापालट करण्याचा प्रयत्नात आहे. तर राज्यातील महाविकास आघाडीला नोव्हेंबर महिन्यात खिंडार पाडण्याचे दिल्ली दरबारी नियोजन सुरू झाले आहे. दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत जवळपास पन्नास मिनिटे प्रथमता चर्चा केली. त्यानंतर अमित शहा यांनी फडणवीस यांना जेवणासाठी आमंत्रण दिले. अमित शहा यांच्या डिनर डिप्लोमसी मागे राज्यातील महाविकास आघाडीला खिंडार पाडण्याचे नियोजन तर नाही ना? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे.


