मुंबई: तीन महिन्याच्या कडकडीत बंदी नंतर आता अनलॉकमध्ये जनजीवन पूर्वपदावर येत आहे. ऑगस्ट महिन्यात शॉपंग मॉल्स , जीम सुरू करण्यात येत आहे. त्यातच भाजपने मंदिरेही खुली करा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.
या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी भाजपला परखड शब्दात उत्तर दिले आहे. जे जनतेच्या हिताचं तेच मी करणार, अशा मुद्द्यावर घाणेरडे राजकारण नको, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.
तसेच, मंदिरासाठी कुणी काय केलंय हे आम्हाला माहितीये, जेव्हा वेळ आली होती तेव्हा शिवसेनाच पुढे आली, बाकीचे सगळे गप्प होते,अशा प्रखर शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर टीका केली आहे. ते व्हिजन महाराष्ट्र कार्यक्रमात बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “५ तारखेला महाराष्ट्रातली मंदिरं सुरू करण्याची भाजपची मागणी आहे पण जे जनतेच्या हिताचं तेच मी करणार, अशा मुद्द्यावर घाणेरडे राजकारण नको. मंदिरासाठी कुणी काय केलं हे माहिती आहे. जेव्हा वेळ आली तेव्हा हे गप्प बसले होते, शिवसेनाच पुढे आली. तेव्हा लॉकडाऊन असल्यासारखे गप्प होते” असा शब्दिक हल्ला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केला.
दरम्यान, येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत राममंदिराचा पाया रचला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंदिर निर्माणाचा शुभारंभ करणार आहे. मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने सामनातून राममंदिर जन्मभूमिचा इतिहास मांडला होता.
तेव्हा बाबरी पाडली म्हणून आज भूमिपूजनाचा सोहळा पाहायला मिळत आहे असे म्हटले होते. तसेच, कारसेवकांचे बलिदान आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या विधानाची आठवणही शिवसेनेने सामनातून करून दिली होती. बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर त्याचा मला अभिमान आहे असे बाळासाहेबांनी म्हटल्याचे सामनातून सांगितले होते. तसेच, त्यावेळी भाजप गप्प बसली असल्याचाही सामनातून म्हटले होते.


