देशाच्या राजकारणात अनैसर्गिक युतीची सत्ता जास्त काळ टीकत नाही – फडणवीस
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असलेल्या कुरबुऱ्यांवरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. महाविकास आघाडी ही अनैसर्गिक युती असून त्यांची सत्ता आहे. मात्र अशी युती ती जास्त काळ टीकत नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला. नुकतीच विधीमंडळ अधिवेशनाचीही तारीख ठरली आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी मोठी रणनीती आखली जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून गेल्या काही दिवसांपासून फडणवीसांनी सरकारविरोधातील आपली आक्रमकता अधिक तीव्र केल्याचे दिसून येत आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही सरकारकडे लक्षच घालत नाही. कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक आंतरविरोध दिसून आले आहेत. हे सरकार आंतरविरोधाने भरलं आहे. कुणाचाच पायपोस कुणाच्या पायात नाही. त्यामुळे हे सरकार जितके दिवस चालायचं तितके दिवस चालेल. एक त्यांची सत्ता जाईल. त्यामुळे ते काय म्हणतात हे काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही. ही अनैसर्गिक युती आहे. अशी अनैसर्गिक युती देशाच्या राजकारणात फारशी कधी टिकली नाही.” असेही फडणवीस म्हणाले.
यावेळी त्यांनी धोकादायक इमारतींचाही मुद्दा उपस्थित केला. धोकादायक इमारतींची संख्या किती आहे, याची माहिती घेतली पाहिजे. सुशांत सिंह प्रकरणावर बोलताना त्यांनी लवकरच सीबीआय चौकशी पूर्ण करेल आणि सत्य बाहेर येईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच काँग्रेसने आत्मचिंतन करावं. काँग्रेस पक्षाला आपला अध्यक्ष देखील ठरवता येत नाही, असं म्हणत त्यांनी काँग्रेस वादावर काँग्रेसला टोला लगावला.
केंद्राचे निर्णय राज्य सरकार लागू करत नाही. राज्य सरकारच्या धोरणांमध्ये गोंधळ आणि विसंगती दिसून येत आहे. केंद्र सरकारचे निर्णय इतर राज्यात लागू करण्यात आले आहेत. मात्र, महाराष्ट्रात ते लागू झालेले दिसत नाही, तो ट्रान्सपोर्टचा मुद्दा असेल किंवा इतर वेगळे निर्णय असतील. ई-पासच्या मुद्द्याचं औचित्यच आता संपलेलय, असे फडणवीस यांनी म्हटले. लोकं बसने प्रवास करू शकतात, तुम्ही पाहिलंच असेल अनेक मिम्स या मुद्द्यावरुन तयार झाले, व्यंग तयार केले आहेत. त्यामुळे, आता देशाचा विषय संपलाय, तसा महाराष्ट्रातही विषय संपला पाहिजे, असे म्हणत ई-पासचे बंधन संपुष्टात आणण्याची मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आघाडी सरकारने काँग्रेसच्या आमदारांना निधी न देता विरोधकांना निधी दिल्याच्या चर्चेवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “विरोधी पक्षांच्या आमदारांना कुठल्याही प्रकारचा निधी देण्यात आलेला नाही. उलट आमच्या आमदारांची मंजूर झालेली कामं रद्द करण्यात आली आहेत. या प्रकरणी न्याय न दिल्यास आम्ही याविरोधात उच्च न्यायलयात जाणार आहोत. मराठा आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील असून सरकारने या विषयाबाबत गंभीर राहावं, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिला.

