मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनुसूचित जमाती व वननिवासी लोकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वनवासी क्षेत्रातील अनुसूचित जमातींना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी वनाधिकार अधिनियम २००६ मध्ये बदल करत अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी कुटुंबांना निवासालगतच्या वनक्षेत्रात घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे.अधिसूचनेची प्रत राजभवनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमुळे अनुसूचित क्षेत्रात पूर्वीपासून राहात असलेले वननिवासी तसंच अनुसूचित जमातीतील लोकांना दिलासा मिळणार आहे.
अनुसूचित जमातीतील लोकांचे मूळ गावातून स्थलांतर कमी होईल अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली आहे.सदर अधिसूचना राज्यपालांनी संविधानाच्या पाचव्या अनुसूचीतील परिच्छेद ५, उपपरिच्छेद १ अंतर्गत असलेल्या प्राप्त अधिकारांचा वापर करून काढली आहे.अनुसूचित क्षेत्र असलेल्या पालघर, नंदूरबार आणि गडचिरोली या जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांच्या भेटी दरम्यान राज्यपालांच्या निदर्शनास आले की, काही अनुसूचित जमाती आणि वननिवासी कुटुंबे अनुसूचित क्षेत्रातील त्यांच्या मूळ वसतिस्थानापासून वाढलेल्या कुटुंबासाठी जागा उपलब्ध नसल्याने इतरत्र स्थलांतर करीत आहेत. या संदर्भात सर्व संबंधितांशी चर्चा करून सदर अधिसूचना जारी करण्यात आली आहे.


