महाराष्ट्र सरकार विरुद्ध CBI, आता परवानगीशिवाय CBI ला राज्यात परवानगी नाही
मुंबई : सीबीआयला आता महाराष्ट्रात राज्य सरकारच्या परवानगीनंतरच तपास करता येणार आहे. अलीकडची काही प्रकरणे पाहता राज्य विरुद्ध केंद्र या संघर्षातून हा खूप मोठा निर्णय घेतला गेल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याआधी अन्य काही राज्यांनीही असे पाऊल उचलले आहे.
राज्याच्या गृह विभागाने याबाबत आज अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार यापुढे महाराष्ट्रातील कोणत्याही प्रकरणाची चौकशी करायची असल्यास त्यासाठी सीबीआयला आधी राज्य सरकारशी संपर्क साधावा लागणार आहे. राज्य सरकारची रितसर परवानगी मिळाल्यानंतरच सीबीआयला चौकशी करता येणार आहे.
दरम्यान, राज्यात सीबीआयला थेट तपासाची परवानगी नाकारणारे महाराष्ट्र हे काही पहिले राज्य नाही. याआधी आंध्र प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यांनीही अशाप्रकारची अधिसूचना काढून सीबीआयला परवानगीशिवाय तपासास मनाई केलेली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडी सरकारने आता सीबीआयला दिलेली ‘सामान्य संमती’ नाकारली आहे. त्यामुळे, आता महाराष्ट्र राज्य सरकार विरुद्ध सीबीआय अशी परिस्थती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये देखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ला राज्यात प्रवेश करू दिला नव्हता.
सीबीआयला दिल्ली विशेष पोलीस आस्थापने अंतर्गत महाराष्ट्रात येऊन तपास करायचे अधिकार होते. मात्र, ठाकरे सरकारने सीबीआयला दिलेले हे अधिकार आता काढून घेतले आहेत. त्यामुळे, आता राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआय महाराष्ट्रात येऊ शकत नाही.
केंद्र सरकारला राज्यासह सर्व संस्था ताब्यात ठेवायच्या आहेत. भाजप सरकार सीबीआय चा राजकीय वापर करत असल्याचा गंभीर आरोपही त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
