भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला ३१७ धावांनी पराभूत केले. ४ कसोटींच्या मालिकेत भारताने विजयासह १-१ अशी बरोबरी साधली. विश्व अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला पुढील दोनही कसोटी सामने महत्त्वाचे आहेत. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताची फिरकी गोलंदाजी उत्तम झाली. पण वेगवान गोलंदाजांना अपेक्षित यश मिळू शकलं नाही. आता तिसरा सामना २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान अहमदाबादला होणार आहे. या सामन्यासाठी भारताचा स्टार खेळाडू संघात परतणार असल्याची चर्चा आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी यांना गंभीर दुखापत झाली होती. पण हे दोघे आता दुखापतीमधून पूर्णपणे सावरले आहेत, त्याचबरोबर ते पूर्ण फिटही झाले आहेत. त्यामुळे आता त्यांना तिसऱ्या कसोटी सामन्यात संघात स्थान मिळू शकते. शमीच्या हाताला ऑस्ट्रेलियामध्ये फलंदाजी करत असताना हातावर चेंडू आदळला होता, त्यामुळे त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता. पण आता तो या दुखापतीमधून सावरला आहे. सैनीला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात ग्रोइन इंजरी झाली होती. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियात खेळता आले नव्हते, पण आता तो पूर्णपणे फिट झाला आहे.
भारतातील स्थानिक क्रिकेट स्पर्धा असलेल्या विजय हजारे करंडकमध्ये शमी आणि सैनी दोघेही खेळणार होते. पण भारतीय संघाच्या व्यवस्थापनाने या दोघांनाही स्थानिक स्पर्धेत। न खेळण्याचा सल्ला दिला. मंगळवारी दुसरी कसोटी संपली त्यामुळे लवकरच उर्वरित दोन कसोटीसाठी संघाची घोषणा करण्यात येणार आहे.
