भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉने (८९ चेंडूंत नाबाद १०५ धावा) झळकावलेल्या शतकाला सूर्यकुमार यादव (५०) आणि धवल कुलकर्णी (३/३५) यांच्या कामगिरीची अप्रतिम साथ लाभल्याने मुंबईने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. मुंबईने दिल्लीचा सात गडी आणि १०९ चेंडू राखून धुव्वा उडवला.
प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरुवात निराशाजनक झाली. अनुभवी सलामीवीर शिखर धवन (०), अनुज रावत (०), नितीश राणा (२) स्वस्तात माघारी परतले. कुलकर्णीच्या भेदक गोलंदाजीपुढे त्यांची एकवेळ ६ बाद ३२ धावा अशी अवस्था झाली. परंतु हिम्मत सिंग (नाबाद १०६) आणि शिवांक वशिष्ठ (५५) यांनी सातव्या गड्यासाठी रचलेल्या १२२ धावांच्या भागीदारीमुळे दिल्लीने ५० षटकांत किमान ७ बाद २११ धावांपर्यंत मजल मारली.
लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने यशस्वी जैस्वालला (८) लवकर गमावले. परंतु त्यानंतर पृथ्वीने सामन्याची सूत्रे हाती घेतली. पृथ्वीने १५ चौकार आणि दोन षटकारांसह धडाकेबाज शतकी खेळी साकारून सूर गवसल्याचे संकेत दिले. त्याने सर्वप्रथम कर्णधार श्रेयस अय्यरसह (३९) दुसऱ्या गड्यासाठी ८२ धावांची भर घातली. तर इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या सूर्यकुमारच्या साथीने त्याने तिसऱ्या गड्यासाठी ९३ धावांची भागीदारी रचली. सूर्यकुमारनेदेखील नेहमीच्या आक्रमक शैलीत फटकेबाजी करताना सहा चौकार आणि दोन षटकारांसह ३३ चेंडूंत ५० धावा काढल्या. पृथ्वीनेच चौकार लगावून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आता मंगळवारी मुंबईची महाराष्ट्राशी गाठ पडणार आहे.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली : ५० षटकांत ७ बाद २११ (हिम्मत सिंग नाबाद १०६, शिवांक वशिष्ठ ५५; धवल कुलकर्णी ३/३५) पराभूत वि. मुंबई : ३१.५ षटकांत ३ बाद २१६ (पृथ्वी शॉ नाबाद १०५, सूर्यकुमार यादव ५०; ललित यादव २/३२)
