
लाखो ठाणेकरांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या व मुंबई-ठाण्यातील कोंडी फोडण्यासाठी कोपरी पूल बांधण्याचे काम लष्कराला देण्याची सर्वप्रथम मागणी भाजपचे नगरसेवक मनोहर डूंबरे यांनी 30 ऑगस्ट रोजी केली होती. या संदर्भात श्री. डूंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यावेळी यासंदर्भात लवकरच बैठक घेणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंगळवारी ही मागणी केली.
ठाणे शहराबरोबरच घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडीमुळे नागरीक त्रस्त आहेत. तर काही संघटना व फेडरेशनने आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगरसेवक मनोहर डूंबरे यांनी भेट घेतली होती.
पूर्व द्रुतगती महामार्गावर कोपरी येथे नवा पूल बांधण्यात येणार आहे. मात्र, त्याला दीर्घ कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील एल्फिन्स्टन रोड येथील पुलाच्या धर्तीवर कोपरी पूलाचे कामही लष्कराकडे सोपवावे, या पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण झाल्यास कोपरी पूलावरील वाहतूककोंडी टळू शकेल, असे मनोहर डूंबरे यांनी निवेदनात म्हटले होते. त्यानंतर याबाबत लवकरच बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. या मागणीला महापालिकेतील विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनीही पाठिंबा दर्शविला होता.
दरम्यान, भाजपचे नगरसेवक मनोहर डूंबरे, नगरसेवक मिलिंद पाटील यांच्यापाठोपाठ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोपरी पूलाचे काम लष्कराकडे सोपविण्याची मागणी केल्यामुळे पूलाचे काम लष्करालाच दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


