पूरस्थितीत मदतीला विलंब लागल्यानेच…. देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर निशाणा
मुंबई: राज्यात पावसाने सर्व भागातच यावर्षी चांगलाच जोक धरला आहे. काही जिल्ह्यांत मुबलक पाऊस पडला तर काही ठिकाणी पुरजन्य परिस्थिती उद्भवली. विदर्भात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मोठं नुकसान झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील ५८ गावातील तब्बल २६४६ कुटुंब पूरबाधित झाले आहेत. प्रशासनाच्या वतीने मदत व बचाव कार्य युद्धस्तरावर सुरू असून जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज (३१ ऑगस्ट) दिवसभर पूरग्रस्त भागाला भेटी देऊन पाहणी केली. विदर्भातील या पूरस्थितीत मदतीला विलंब लागल्यानेच घरे आणि शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
पुराचे पाणी शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे.
36 तास हाती असताना वेळीच उपाययोजना केल्या असत्या, तर मोठे नुकसान टळले असते. पण, मदतीला विलंब लागल्याने घरे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.#Floods #Vidarbha pic.twitter.com/XhOi7DZ13i— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 31, 2020
पुराचे पाणी शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. ३६ तास हाती असताना वेळीच उपाययोजना केल्या असत्या, तर मोठे नुकसान टळले असते. पण, मदतीला विलंब लागल्याने घरे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, असे म्हणत फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मध्य प्रदेश सरकारसोबत राज्य शासनाने योग्य समन्वय साधला नाही. राजीव सागर धरणातून पाणी सोडल्यानंतर ते पाणी ३६ तासात पूर्व विदर्भात पोहोचते. मात्र, ३६ तास हाती असतानाही विलंब केल्याने हे पाणी गावात शिरले. वेळीच अलर्ट दिला असता, तर हे संकट टाळता आलं असतं, असेही फडणवीस यांनी म्हटले.


