चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. दुसऱ्या सामन्यासाठी असणाऱ्या खेळपट्टीवर चर्चा सुरु आहे. चेपॉकची खेळपट्टी पहिल्या दिवसांपासूनच फिरकीला मदत करणारी असल्यामुळे अनेक विदेशी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. इंग्लंड संघाचे माजी कर्णधार मायकल वॉन यानं खेळपट्टीवरुन नाराजी व्यक्त केल्यानंतर शेन वॉर्न यानं आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. चेन्नईच्या या खेळपट्टीवर आता समालोचक सुनील गावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाला की, ‘खेळपट्टीवरुन होणारा वाद निरर्थक आहे. इंग्लंड संघातील फलंदाजांनी जबाबदारीनं फलंदाजी केली नसल्यामुळे सामन्यात भारतीय संघानं वर्चस्व गाजवलं आहे.’
सामन्यादरम्यान समालोचन करताना सुनील गावसकर यांनी इंग्लंड संघावर टीकास्त्र डागलं आहे. इंग्लंड संघाची गोलंदाजी आणि फलंदाजीवर गावसकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. गावसकर म्हणाले की, ‘भारताने दुसऱ्या डावात इंग्लंडच्या पहिल्या डावातील धावसंख्येला मागे टाकलं आहे. याचाच अर्थ खेळपट्टी फलंदाजीसाठी तितकी खराब नाही. एकतर इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीचा पूर्ण फायदा घेता आला नाही. किंवा भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या फंलदाजापेक्षा चांगली गोलंदाजी केली आहे.’
गावस्कर म्हणाले की, ” जेव्हा इंग्लंडमध्ये गवत असलेल्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचा संघ जेव्हा ४६ धावांवर ऑलआऊट होतो तेव्हा कोणीही खेळपट्टीबाबत बोलत नाही. पण जेव्हा भारतामध्ये फिरकीला पोषक खेळपट्टी पाहायला मिळते, त्यावर मात्र टीका व्हायला सुरुवात होते. जर खेळपट्टी एवढी खराब असली असती तर रोहित शर्माने दिडशतक झळकावले नसते. त्याचबरोबर भारतीय संघाने तिनशे धावांचा पल्लाही गाठला नसता. त्यामुळे खेळपट्टीवर टीका करताना काही गोष्टी पाहायला हव्यात.”
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन आपल्या ट्विटमध्ये म्हणाला होता की, ” चेन्नईची खेळपट्टी ही कसोटी सामन्यासाठी नक्कीच चांगली नाही. कारण पहिल्या कसोटी सामना जर भारतीय संघाने या खेळपट्टीवर अनिर्णीत राखला असता तर त्यांची फलंदाजी या सामन्यात अजून चांगली झाली असतील. पण गेल्या दोन सत्रांमध्ये खेळपट्टीने निराश केले असल्याचे मला वाटते.”
ऑस्ट्रेलियाचा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्नने वॉनला यावेळी चांगलेच उत्तर दिले आहे. वॉर्न यावेळी म्हणाला की, ” पहिल्या कसोटी सामन्यातही खेळपट्टी फिरकीला पोषक होती. पण त्यावेळी भारतीय संघाला जिंकण्याची संधी नव्हती त्यामुळे खेळपट्टीबाबत कोणीच काही म्हटले नाही. या सामन्यात दोन्ही संघांतील गोलंदाजांना समान संधी आहे. पण इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही. त्याचबरोबर रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि पंत यांनी चांगली फलंदाजी केली. त्यामुळे खेळपट्टीवर टीका करता येणार नाही.”
