चेन्नई येथेली चेपॉक स्टेडियमवर मंगळवारी भारतीय संघावर विराट पराभवाची नामुष्की ओढावली. जेम्स अँडरसनच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करल्यानं इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात यजमानांवर २२७ धावांनी दणदणीत यश संपादन केलं. या विजयासह इंग्लंड संघानं चार कसोटी सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं तीन फिरकीपटूंना संघात स्थान दिलं होतं. मात्र, अश्विनचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला आपला प्रभाव पाडता आला नाही. इंग्लंडचे खेळाडू डाव्या हाताच्या फिरकी गोलंदाजांना खेळताना अडखळतात म्हणून कुलदीप यादव याला डावलून नवख्या शाबाज नदीमला संघात स्थान देण्यात आलं होतं. मात्र, विराट कोहलीच्या या निर्णायावर अनेकांनी नाराजी व्यक्त करत टीका केला होती.
गावस्कर याबाबत म्हणाले की, ” माझ्यामते दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात बदल करायला हवा. दुसऱ्या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवला संधी द्यायला हवी, असे मला वाटत आहे. संघामध्ये आर. अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोन फिरकीपटू आहेत. अश्विनहा चेंडू हवेत संथगतीने सोडतो, तर सुंदर अश्विनपेक्षा जास्त वेगात चेंडू सोडतो. त्यामुळे जर कुलदीपला संघात स्थान दिले तर नक्कीच गोलंदाजीमध्ये विविधता पाहायला मिळेल.”
वॉशिंगटन सुंदरला दुसऱ्या सामन्यातून वगळणं थोडं कठीण आहे. कारण, गोलंदाजीत अपयशी ठरला असला तरी पहिल्या डावात त्यानं महत्वपूर्ण ८५ धावांची खेळी केली होती. त्यामुळे सुंदरचं संघातील स्थान अबाधित राहू शकतं. दुसऱ्या कसोटीसाठी कोणाला संघात ठेवायचं आणि कोणाला वगळायचे, हा निर्णय संघ व्यवस्थापनाचा असेल. नदीम की सुंदर यांच्यापैकी कोणाला विश्रांती द्यायची, हे त्यांनाच ठरवावे लागेल. पण कुलदीपला दुसऱ्या कसोटीत स्थान मिळायला हवं असं मला वाटतं, असे गावसकर म्हणाले.
कुलदीपला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातही कसोटी मालिकेत एकही संधी देण्यात आली नव्हती. पहिल्या कसोटीसाठी नदीमला संभाव्य संघात स्थान मिळाले नव्हते. पण फिरकीपटू अक्षर पटेल हा सराव करत असताना दुखापतग्रस्त झाला. त्यानतर संघात नदीम आणि राहुल चहर या दोन्ही फिरकीपटूंना स्थान देण्यात आले. संघातील गोलंदाजीमध्ये विविधता असावी, यासाठी एका डावखुरा फिरकीपटू ला खेळवावे, असा निर्णय पहिल्या सामन्यासाठी घेतला होता. पण आता दुसऱ्या सामन्यासाठी संघात नक्कीच बदल केले जातील, असे संकेत सध्याच्या घडीला मिळत आहेत. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात कुलदीपला संधी मिळेल, अशी आशा चाहते करत आहेत.
