करोनाविषयक कामांसाठी १००० कोटी खर्च
मुंबई: गेल्या सात महिन्यांपासून मुंबईत करोना संसर्गामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असून करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आरोग्य विभागासाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या रकमेपैकी एक हजार कोटी रुपये म्हणजेच २५ टक्के निधी करोनाविषयक उपाययोजनांसाठी खर्च झाला आहे.
मुंबईत मार्चमध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर सातत्याने करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सुरुवातीच्या काळात पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. मात्र वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेऊन पालिकेची काही रुग्णालये खास करोनाबाधित रुग्णांसाठी राखीव करण्यात आली. त्याचबरोबर करोना काळजी केंद्र-१, करोना काळजी केंद्र-२, करोना समर्पित आरोग्य केंद्र, जम्बो करोना केंद्र आदी उभारण्यात आले. तसेच करोनाबाधिताच्या घराचे निर्जंतुकीकरण, रस्त्यांचे निर्जंतुकीकरण आदींवर मोठा निधी खर्च झाला आहे. करोनाबाधित आणि संशयित रुग्णाच्या सेवासुविधेवरही मोठा खर्च झाला आहे. हा सर्व खर्च पालिकेच्या आरोग्य खात्यासाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीतून करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेतील केईएम, शीव आणि नायर ही तीन प्रमुख रुग्णालये, उपनगरांमधील १८ संलग्न रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने, आरोग्य केंद्रे आदींसाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात येते. मुंबई महापालिकेच्या २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात आरोग्य खात्यासाठी सुमारे ४२६० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. करोनाविषयक कामांसाठी आतापर्यंत एक हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. यापैकी काही निधी आरोग्य खात्याच्या तरतुदीतून, तर काही आकस्मिक निधीतून खर्च करण्यात आला आहे.
निधी खर्च
- करोना रुग्णांवरील उपचारांसाठी केईएम, शीव, नायर या मोठ्या रुग्णालयांतील पायाभूत सुविधांसाठी सुमारे ४० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
- कस्तुरबा रुग्णालय, जेरबाई वाडिया रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, भाभा वांद्रे रुग्णालय आदींमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निधी खर्च करावा लागला आहे.
- अतिदक्षता विभाग, प्राणवायूची व्यवस्था आदींसाठी पालिकेला मोठी रक्कम खर्च करावी लागली.
- रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन डॉक्टर, परिचारिका आणि कक्ष परिचरांची संख्या वाढविण्यात आली.
- रेमेडेसिवीर, टॉसिलिझुमॅब, फेविपीरॅवीर यांसह विविध औषधांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली असून त्यासाठी २०० कोटी रुपये खर्च झाले आहेत.
- रुग्णांना सकस अन्नपुरवठा करण्यासाठीही मोठा निधी खर्च झाला आहे.
- बेघर आणि बेरोजगारांच्या अन्नपदार्थ पुरवठ्यासाठी पालिकेला मोठी रक्कम मोजावी लागली आहे.

