ऐन गणेशोत्सवात मुंबई – गोवा महामार्गाची दुरवस्था
रायगड जिल्हयातून जाणाऱ्या मुंबई – गोवा महामार्गाची पार दुरवस्था झाली आहे. पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर या 84 किलोमीटर रस्त्याच्या रूंदीकरणाचं काम 7,8 वर्षांपूर्वी हाती घेण्यात आलं मात्र अद्यापही ते पूर्ण झालेलं नाही. त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोय . प्रवाशांना पाठीचे आणि मणक्याच्या आजारांना सामोरं जावं लागतंय .
गणेशोत्सवापूर्वी दुरूस्ती ?
महामार्गावरील पूलांची कामं देखील अर्धवट स्थितीत आहेत . कोकण आणि गोव्यात जाण्यासाठी असणारया या मार्गाच्या कामावर आतापर्यंत करोडो रूपये खर्च झाले असले तरी प्रवाशांच्या नशिबी केवळ खड्डेच आहेत . त्यामुळे महामार्गावरील प्रवास नकोसा झालाय.

गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची दुरूस्ती करण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय परंतु रस्त्याची सद्य स्थिती पाहता हे कितपत शक्य आहे याबददल शंकाच आहे .
पावसाचा जोर वाढताच महामार्गासह शहरातील खड्ड्यांची संख्या आणि आकारही वाढत असल्याचे समीकरण दरवर्षी पहायला मिळते. यंदाही परिस्थिती वेगळी नाही. पनवेल परिसरातील मुंबई-गोवा महामार्गावर तारा, पळस्पे फाटा, ओएनजीसी परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
दोन आठवड्यापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने उसळत आहेत. त्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रकार वाढले आहेत.

तसेच चारचाकी वाहनांचेही नुकसान होत आहे.
पावसाळ्यापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी डागडुजी करण्यात आली होती. मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. महामार्गावरील पळस्पे फाटा परिसरात मोठमोठे खड्डे पडले आहेत. याठिकाणाहून अवजड वाहनांचीही वर्दळ सुरू असल्याने दिवसन्दिवस खड्ड्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांचे अपघात वाढले आहेत.
कोकणवासीयांसाठी मुंबई-गोवा महामार्ग महत्त्वाचा मार्ग आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा महामार्गाची बरीच कामे पूर्ण झाली आहेत. तसेच रुंदीकरणाचे कामही वेगात सुरू आहे. मात्र कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने पावसाच्या सुरुवातीलाच महामार्ग खड्डेमय झाला आहे. सध्याच्या घडीला कर्नाळा, आपटा फाटा, तारा गाव आदी ठिकाणी रस्त्याची चाळण झालेली पहायला मिळते. खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा वेग आपोआपच मंदावतो.
गणेशोत्सवात चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जातात. त्यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी होऊन वाहतूककोंडीची समस्या उद्भवते. त्यातच हा मार्ग खड्डेमय असल्यास अपघात होऊन कोंडीत आणखी भर पडते. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाची त्वरित डागडुजी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्ग तसेच ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे परिसरात अपघातांचे प्रमाण वाढत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे हे खड्डे त्वरित भरण्यात यावे.
शरीफ देशमुख
कार्याध्यक्ष, नवभारतीय शिववाहतुक संघटना
+919967840202
