Maharashtra GovShivSenaShivSena-Congress-NCPनवी मुंबईबृहन्मुंबई महानगरपालिका - BMCमुंबईराजकारणसोशल मीडिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली नागरिकांना ८ दिवसांची मुदत !

मुंबई: रविवार संध्याकाळी ७ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावरून लाईव्ह जाऊन सद्य परिस्थितीचा आढावा तसेच पुढील उपाययोज़ना सांगितल्या. यात त्यांनी बरेच मुद्दे आणि त्यावर त्यांची मते प्रदर्शित केलीत. नागरिकांना पुढे काय करायचे हेही सांगितले. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा असे स्पष्टपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ” मी जबाबदार” या मोहिमेची घोषणा केली. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला समाजमाध्यमांतून संबोधित करीत होते.

संसर्ग रोखण्यासाठी अमरावती विभागात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत त्याचा संदर्भ देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, “जिथे जिथे आवश्यकता असेल तिथल्या जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते निर्बंध घालण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. संसर्ग रोखण्यासाठी आता ” मी जबाबदार” मोहीम राज्यभर करणार असेही ते यावेळी म्हणाले. गर्दी वाढत असून राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही तसेच नियम न पाळणारेही मंगल कार्यालये, सभागृहे, हॉटेल्स, उपाहारगृहे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचेही ते म्हणाले.

पाश्चिमात्य देशात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे त्याठिकाणी मोठे निर्बंध टाकण्यात आले आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की सर्व काही खुले करा म्हणून नियम मोडून आंदोलने करणारे आता जेव्हा संसर्ग पसरतोय तेव्हा वाचवायला येणार नाहीत असा टोला त्यांनी मारला. सध्या कोविड योध्द्यांचे सत्कार सुरु आहेत. या योध्यांनी जीवावर उदार होऊन लढाई केली आहे, मात्र त्यांच्या सत्काराच्या निमित्ताने आपण कोविड पसरविणारे ‘कोविड दूत’ बनू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, “गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा आपल्याकडे सुविधा नव्हत्या, ऑक्सिजन, बेडस, रुग्णालये, प्रयोगशाळा पुरेशा नव्हत्या. पण आता सुविधांनी आपण सज्ज आहोत मात्र आता वाढत चालवलेला संसर्ग आपण थांबविला नाही तर या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येईल. एकीकडे आपण सगळॆ खुले करून अर्थचक्राला गती देत आहोत, लोक बिनधास्तपणे नियम मोडून फिरताहेत आणि दुसरीकडे आपण प्रशासन आणि एकूणच यंत्रणेला चाचण्या आणि रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क वाढविण्यास सांगतो आहोत हे बरोबर नाही. सामाजिक जबाबदारी ठेऊन वागणे महत्वाचे आहे” असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी त्यांच्या मुलाचा विवाहाचा स्वागत सोहळा रद्द करून परिस्थितीचे भान ठेवले यासाठी त्यांचे अभिनंदन केले.

“गेले वर्षभरापासून आपण कोरोनाला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय, त्यात आपल्याला यशही आले . मुंबईत आपण दिवसाला ३०० ते ४०० रुग्ण संख्येपर्यंत खाली उतरलो मात्र आता काही दिवसांपासून ८०० ते ९०० रुग्ण आढळत आहेत. राज्यातही दररोज हजार ते दीड हजार रुग्ण वाढताहेत, आज दिवसभरात सुमारे ७ हजार रुग्ण आढळले ही चिंताजनक बाब आहे” अशी चिंता त्यांनी प्रकट करत “मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही याचा निर्णय पुढील ८ दिवसांत जनतेने करायचा आहे” असे सांगितले. त्यामुळे पुढील ८ दिवस हे नागरिकांसाठी एकाप्रकारे परीक्षाच असेल असे दिसते. “मास्क घाला आणि लॉक डाऊन टाळा” हे आवाहन त्यांनी केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button