कोरोनाची परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत महाविद्यालये सुरु होणार नाहीत!
मुंबई: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही तितकीच वाढत आहे. दरम्यान, सरकार टप्प्याने सर्व गोष्टींचा विचार करत त्या दृष्टीने राज्य सरकार अनेक पावले उचलत आहे. गेल्य0 सात महिन्यांपासून महाविद्यालय बंद असून जोपर्यंत कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे निवळत नाही. तोपर्यंत राज्यातील एकही महाविद्यालय सुरू होणार नाही. अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यात अनेक गोष्टी हळूहळू सुरू झाल्या आहेत. आता काही परीक्षा ऑनलाइन आणि ऑफ़लाईन घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही. याबाबत विशेष काळजी घेतली जाणार आहे. ऑफ़लाईन परीक्षेसाठी येणार्या विद्यार्थीची तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर आता लवकरच राज्यातील ग्रंथालय देखील सुरू करणार असल्याचे ते म्हणाले आहेत. राज्य शासनाने ४ मे रोजी प्रसिद्ध केलेला शासकीय पदभरती बंदीचा निर्णय प्राध्यापक भरतीसाठी स्थगित केला जाणार आहे. राज्यातील प्राध्यापकांच्या रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत चर्चा देखील झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
“तसेच अंतिम वर्षातील दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी २० मिनिटे वेळ वाढवून दिला जाणार आहे. त्यामुळे एकाही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. तसेच येत्या काही दिवसात ग्रंथालयही सुरु करण्याचे प्रयत्न केले जात आहे. यासंदर्भात एक बैठकही पार पडली आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. “मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने स्पष्ट भूमिका मांडली आहे. सरकारने दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. आरक्षणाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल,” असेही उदय सामंत म्हणाले.

