मुंबईः ठाण्यात एक विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. रात्री १०.३० च्या ठाण्याहून बोरिवलीच्या दिशेने वाघबीळ उड्डाण पुलावरून जाणाऱ्या मालवाहू वाहनाच्या चालकाचं खड्ड्यामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे तो ट्रक थेट उड्डाणपुलाच्या सुरक्षा भिंतीला जाऊन धडकला. या ट्रकमध्ये असलेले पुठ्ठ्यांचे गठ्ठे उड्डाणपुलाखाली मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाडीवर पडले. ट्रकमधील पुठ्यांचे गाठे उड्डाणपुलाच्या खालून जाणाऱ्या चारचाकी वाहनांवर पडल्यानं हा अपघात झाला.
या घटनेत चारचाकी वाहनाचा चेंदामेंदा झाला. या विचित्र अपघाताची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसह ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथकही घटनास्थळी दाखल झालं.

दरम्यान कारमधील दोघा जणांना बाहेर काढण्यात ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला यश आले असून दोघांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर असल्याची प्राथमिक माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने देण्यात आली. प्रशांत देवरकोंडा असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान आता कारवरील पुठ्ठे आणि ट्रक हटवला आणि खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.
ठाणे शहरातील विविध उड्डाणपुलावरून ट्रक दुर्घटना घडल्याच्या अनेक घटना आहे. या अपघाताने ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांसब उड्डाण पुलावर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



