दहावी आणि बारावी परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाईन होणार !
मुंबई : दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार त्याच तारखेला ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. कोरोनाची परिस्थिती बिघडत चालली आहे. त्यात मुलांची आरोग्य, सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. खूप साऱ्या तज्ज्ञांशी शिक्षण विभागाची चर्चा सुरू आहे, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज स्पष्ट केलं. ऑगस्टला आम्ही सिलॅबस कमी करण्याचं काम केलं. नोव्हेंबरमध्ये बोर्ड पेपर पॅटर्न ठरवतो त्याची तपासणी कशी करायचं हे ठरतं. गावखेड्यात पेपर पोहचवायला कमीत कमी दोन महिने लागतात. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दीड ते दोन महिने लागतात. आठवी-नववीच्या परीक्षेबाबत लवकरच निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
“आम्ही खूप साऱ्या तज्ञांशी यासंबंधी बोलत आहोत. सध्या तरी परीक्षेची जी तारीख दिली आहे त्या वेळापत्रकानुसारच परीक्षा होणार आणि ऑफलाइन पद्धतीने होणार कारण ही बोर्डाची परीक्षा आहे. आम्ही ऑगस्टमध्ये अभ्यासक्रम कमी करण्याचं काम केलं. नोव्हेंबरपासून पेपर पॅटर्न, त्याची तपासणी कशी करायची हे ठरतं. आम्हाला गाव खेड्यापर्यंत पेपर पोहोचवण्यासाठी किमान दोन महिने लागतात. हे सगळं करत असताना प्रक्रियेसाठी बोर्डाने किमान दीड ते दोन महिने लागतात. मागील वर्षात मुलांचं जे नुकसान झालं आहे त्याचा विचार करावा लागेल,” असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार असल्याचे राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे एप्रिल-मे २०२१ मध्ये घेण्यात येणार्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक १६ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आलं होतं.
राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या या संभाव्य वेळापत्रकावर संघटना, शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षणतज्ज्ञांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार आलेल्या सूचनांचे अवलोकन करून राज्य मंडळाने दहावी व बारावीचे संभाव्य वेळापत्रकच अंतिम केल्याचे जाहीर केले. त्यानुसार अंतिम वेळापत्रक राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येणार आहे.
पुढील अभ्यासक्रमासाठी या मुलांचा पाया मजबूत होणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे या मुलांचं शिक्षण सुरु राहू दे. सध्या ऑनलाइन पद्धतीनं शिक्षण सुरु आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जिथे रुग्ण वाढले आहेत तिथे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पण जर नववीचा विद्यार्थी शेवटपर्यंत शिकला नाही तर दहावीसाठी कसा तयार होईल? किंवा अकरावीचा विद्यार्थी शिकला नाही तर बारावीची बोर्डाची परीक्षा कसा देईल? त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन, ऑफलाइन माध्यमातून सुरु राहावं यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परीक्षेसंबंधी लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.