इतरठाणे शहर

आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा रविवारी ठाणे येथे हेल्थ कार्ड्सचे वाटप

देशभरात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ रविवार 23 सप्टेंबर  रोजी प्रधानमंत्री यांच्या हस्ते झारखंड राज्यातील रांची येथे होणार आहे. ठाणे येथे देखील या योजनेचा शुभारंभ रविवारी दुपारी १२ वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत होईल असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हेही उपस्थित असतील. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात ५ कुटुंबांना हेल्थ कार्डचे वाटप केले जाईल.
३.५ लाख कुटुंबाना फायदा
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ८३ हजार ८९३ तर शहरी भागातील २ लाख ६५ हजार कुटुंबांना याचा लाभ होणार आहे अशी माहिती या योजनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण मोटे यांनी दिली. राज्य आरोग्य हमी सोसायटी, जीवनदायी भवन, वरळी येथून या योजनेचे नियंत्रण केले जाणार आहे.
कोण पात्र आहेत
आयुष्यमान भारत योजनेत पात्र लाभार्थी ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमातीचे दारिद्र रेषेखालील कुटुंब, भूमिहीन कुटुंब, दिव्यांग सदस्य असलेले कुटुंब, अतिकष्टाचे काम करणारे कुटुंब, एकाखोलीचे कच्चे घर असलेले कुटुंब, महिला कुटुंब प्रमुख असलेले, यांचा या  योजनेत सहभाग आहे. तर शहरी भागातील कचरा वेचणारे कुटुंब, भिकारी, घरकाम करणारे, रस्त्यावर विक्री करणारे, बांधकाम, रंगकाम, प्लंबर, गवंडी,वेल्डर, गटई कामगार, फेरीवाले, झाडू मारणारे / सफाई कामगार, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतूक कर्मचारी, चालक, वाहक व सायकल रिक्षा ओढणारे, दुकानात काम करणारे शिपाई, अटेंडट, हॉटेल वेटर, मेकॅनिक / वीजतंत्री, असेम्ब्ली , दुरुस्ती करणारे, धोबी आणि चौकीदार या वर्गीकरणातील कुटुंब या योजनेत पात्र आहेत.

या कुटुंबाना प्रति वर्षी प्रति कुटुंब आरोग्यासाठी 5 लाख रुपये  विमा संरक्षण राहणार आहे. या योजनेंतर्गत त्या कुटुंबाना ठराविक आजारासाठी संपूर्ण देशभरातील कोणत्याही मान्यता प्राप्त रुग्णालयात उपचार घेता येतील. यासाठी लाभार्थी कुटुंबाना ई-कार्ड देण्यात येणार आहेत.
यासाठी जी रुग्णालये संलग्न करण्यात येतील त्या रुग्णालयातील आरोग्य मित्र हे ई-कार्ड देतील.

सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालय व भिवंडी येथील इंदिरा गांधी,  कळवा येथील छत्रपती शिवहीजी महाराज तसेच उल्हासनगर येथील रुग्णालये संलग्नित करण्यातआले आहेत.
या योजनेंतर्गत 1 हजार 122 आजारांचा समावेश करण्यात आलेला आहे.

तूर्त राज्यात सध्या महात्मा ज्योतिबा फुले जन-आरोग्य योजना ही कार्यान्वित आहे. आयुष्यमान भारत योजनेसोबतच ही योजना चालू राहणार आहे. आयुष्यमान भारत योजनेत किरकोळ व मोठे आजार यांच्या उपचारांचा समावेश आहे. हे या योजनेचे वैशिष्ट्य होय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button