भारताचा एक महत्वाचा खेळाडू आता पूर्णपणे फिट झाला आहे. त्यामुळे आता तिसऱ्या आणि कसोटी सामन्यात तो खेळणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात या खेळाडूला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो पूर्णपणे सावरला असून आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आता तो खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण झाल्यामुळे वेगवान गोलंदाज उमेश यादवचा सोमवारी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. अहमदाबाद येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी उमेशच्या खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे शार्दूल ठाकूरला विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेसाठी मुंबई संघाकडून खेळण्यासाठी मुक्त करण्यात आले आहे. मोटेरा येथे रविवारी उमेश तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण झाला, असे ‘बीसीसीआय’कडून सांगण्यात आले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबाद येथे २४ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. हा सामना दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता आता सर्वांनाच लागलेली आहे. कारण या भव्य मैदानातील हा पहिलाच सामना असणार आहे. त्यामुळे हे मैदान भारतासाठी लकी ठरते का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.
सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये दोन कसोटी सामने झाले आहेत. यानंतर होणारे दोन्ही कसोटी सामने अहमदाबाद येथेच खेळवण्यात येणार आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेला १२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. ही मालिका १२ ते २० मार्च या कालावधीत होणार आहे. हे सर्व सामने अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत.
