आशिष शेलारांनी मानले संजय राऊतांचे आभार, म्हणाले ‘हीच ती वेळ’
मुंबई : करोनामुळे देशासह महाराष्ट्रासह मोठी संकटकालीन परिस्थिती उद्भवली आहे. मागील दोन महिन्यांपासून जनजीवन ठप्प झाले असून, लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या हळूहळू व्यवहार सुरू होत असले तरी या काळात शिक्षण क्षेत्राचं वेळापत्रक पूर्णपणे बिघडले आहे. राज्यातील विद्यापाठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. परीक्षा घ्यायच्या की नाही, यावरून बराच वाद निर्माण झाला आहे. त्याच मुद्यावर शिवसेनेचे नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी अग्रलेखातून भूमिका मांडली. त्यांच्या भूमिकेचं भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी स्वागत केलं. त्याचबरोबर आभारही मानले आहेत.
हीच ती वेळ!!
पदवी अंतिम वर्ष परिक्षा आणि ATKT असलेल्या 40% विद्यार्थ्यांचे भवितव्य काय? विद्यार्थ्यांच्या या "शैक्षणिक आरोग्याची" काळजी करणारी भूमिका आम्ही मांडली. सामनाचे कार्यकारी संपादक @rautsanjay61 यांनी ही विद्यार्थ्यांची काळजी अग्रलेखात अधोरेखित केली.
त्याबद्दल आभार! 1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 4, 2020
विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याच्या मुद्यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सामनातून आपली भूमिका विशद केली. राऊतयांनी घेतलेल्या भूमिकेचं शेलार यांनी स्वागत केलं आहे. “हीच ती वेळ! पदवी अंतिम वर्ष परीक्षा आणि एटीकेटी असलेल्या ४० टक्के विद्यार्थ्यांचे भवितव्य काय? विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक आरोग्याची काळजी करणारी भूमिका आम्ही मांडली. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनीही विद्यार्थ्यांची काळजी अग्रलेखात अधोरेखित केली. त्याबद्दल आभार! उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत मात्र, योग्य वेळी निर्णय घेऊ असं सांगत आहेत. प्रश्न लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे. त्यामुळे संजय राऊत यांनीच मंत्र्यांना सांगावे की, निर्णय घेण्याची ‘हीच ती वेळ’, असं आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

