निसर्ग’ मुंबईत धडकणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हाधिका-यांच्या संपर्कात
मुंबईकरांसाठी पुढचे सहा तास महत्त्वाचे
मुंबई : निसर्ग चक्रीवादळ अलिबाग येथे धडकले असून झाडं कोसळली. घराचे छप्पर, स्टेट बॅंकेच्या छताची पत्रे उडाली. काही तासांतच हे वादळ मुंबईत धडकणार आहे. मुंबईत मोठ्या नुकसानाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईत या वादळाच्या प्रभावाने नरीमन पॉइंट भागातील झाडे कोसळली आहेत. मुंबईत यंत्रणा सतर्क असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हाधिका-यांच्या संपर्कात आहेत.
चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री आढावा घेत आहेत. मुंबई मनपा आयुक्तांनी किनारपट्टी भागाची पाहणी केली आहे. ते वर्सोवा किना-यावर जाणार आहेत. तेथील निवारा केंद्राला भेट देणार आहेत. वादळाचा धोका लक्षात घेऊन किना-यालगत राहणा-या रहिवाशांची बीएमसीच्या ३५ शाळांमध्ये तात्पुरत्या निवा-याची सोय केली आहे.

अम्फान वादळाने ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये थैमान घातल्यानंतर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आणि गुजरातमध्ये निसर्ग वादळं धडकले आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार वादळ मुंबईच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. एनडीआरएफने लोकांना या चक्रीवादळापासून सतर्क राहण्यास सांगितले आहे.
एनडीआरएफचे डीजी एसएन प्रधान म्हणाले की, वादळाच्या धडकण्याआधी सुरुवातीचे ६ तास आणि नंतरचे ६ तास फार महत्वाचे आहेत, त्यामुळे लोकांना बाहेर न जाण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम दिसू लागला आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

तर, अलिबाग, पालघर आणि मुंबई येथे वादळामुळे पाऊस सुरू झाला आहे. वादळ जसजसं पुढे सरकेल तसतसे या भागात जोरदार वारे वाहू लागतील. रात्री १२ ते ४ पर्यंत वादळ तीव्र स्वरुपात येणार आहे. असे एअर व्हाइस मॉर्टल जीपी शर्मा यांनी सांगितले. एएनआयने हे वृत्त दिले.
मुंबईत एनडीआरएफच्या टीम तैनात आहेत. वांद्रे वरळी सी लिंकवर पुढचे काही काळ वाहतूक बंद आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला. निसर्गचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

