Corona Updates

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पुन्हा ‘धारावी पॅटर्न’ सुरू !

मुंबई: राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने करोनाकाळात चर्चेचा विषय ठरलेल्या धारावीत आतापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आली आहे. दिवसाला शुन्य आणि एक असा बाधितांचा आकडा असलेल्या धारावीत पुन्हा १२ ते १५ रुग्ण दिवसाअखेरीस आढळत आहेत. भविष्यात हे प्रमाण वाढू नये या अनुषंगाने आतापासून पालिका आणि पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. बेशिस्तपणे वावरणाऱ्यांविरुद्ध कारवाई, घरोघरी जाऊन तपासणी, पोलिसी धाक अशा उपाययोजनांचा ‘धारावी पटर्न’ पुन्हा एकदा राबवला जात आहे.

टाळेबंदी काळात वाढत्या रुग्णांमुळे स्मशानशांतता अनुभवलेली धारावी आता पूर्वपदावर आली आहे. उद्योग व्यवसाय सुरळीत झाल्याने बाजारपेठांमध्येही गर्दीचे वातावरण आहे. पण या गर्दीत प्रकर्षांने जाणवते ती बेशिस्त. याच बेशिस्तपणामुळे धारावीत पुन्हा करोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी दिवसाला शून्य आणि एक अशी बाधितांची संख्या होती, जी आता दहा ते बाराच्या घरात पोहोचली आहे. महिनाभरापूर्वी दादर येथील वनिता समाज कोविड सेंटरमध्ये तीन ते चार रुग्ण असायचे. आता ती संख्या आता १०० वर येऊन पोहोचली आहे. हा आकडा झपाटय़ाने वाढू नये यासाठी पालिकेसोबतच पोलीस यंत्रणाही कामाला लागली आहे.

‘पूर्वी लोकांचे विलगीकरण करून मग करोना चाचणी केली जात होती. सध्या प्रत्येकापुढे पोटापाण्याचा प्रश्न असल्याने लोक विलगीकरणासाठी तयार होत नाहीत. त्यामुळे थेट चाचणी करण्यावर भर दिला जात आहे. जेणेकरून संसर्गाला आळा बसेल. ठिकठिकाणी क्लीन अप मार्शलही तैनात केले आहेत,’ अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. प्रत्येक विभागात गस्त, स्थानिक प्रतिनिधींना जनजागृतीचे आव्हान, बाजारातील गर्दीवर नियंत्रण, मुखपट्टीविना फिरणाऱ्यांवर कारवाई या माध्यमातून पोलीस प्रशासनानेही नागरिकांना शिस्त लावण्याचा विडा उचलला आहे.

‘जी उत्तर विभागात एकूण ११ आरोग्य केंद्रे आहेत. त्यापैकी नऊ धारावीत आहेत. त्या सर्व केंद्रांवर सध्या करोना तपासणी सुरू केली आहे. या व्यतिरिक्त मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून आणि घरोघरी जाऊन डॉक्टर तपसणी करीत आहेत. एका बाधित रुग्णाच्या संपर्कातील २० ते २५ व्यक्तींची करोना चाचणी केली जात आहे,’ अशी माहिती जी-उत्तर विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

‘धारावीला मागचे दिवस पाहायला लागू नये यासाठी प्रत्येक विभागात जाऊन दखल घेत आहे. दोन दिवसांपूर्वी टी-जंक्शन परिसरात एका तासात मुखपट्टीविना फिरणाऱ्या ९० लोकांवर कारवाई केली. विभागवार स्थानिक प्रतिनिधी, गणेशोत्सव मंडळे यांना जनजागृतीचे आणि आपापल्या विभागात सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. पोलीस ठाण्याच्या वतीने काही खासगी रुग्णालयांतील डॉक्टरना तपासणीसाठी बोलावण्यात येते. बाजारापेठांमध्ये स्थानिकांशिवाय बाहेरून येणाऱ्यांवर र्निबध घातले आहेत. गर्दी नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहेत,’ अशी माहिती धारावी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलाब पाटील यांनी दिली.

करोनाचे प्रमाण वाढत असले तरी लाखोंची लोकसंख्या असलेल्या धारावीत रोज विविध धार्मिक उत्सव, लग्न सोहळे, वराती असे अनेक कार्यक्रम सर्रास होत आहेत. चर्मोद्योग, कुंभारकाम, प्लास्टिक वस्तू, कपडे, जरीकाम अशा उद्योग-व्यवसायांमुळे इथले रस्ते आणि बाजारपेठांमध्ये दिवसरात्र गर्दी असते. या एकूण वातावरणात सामाजिक अंतर नियम आणि मुखपट्टीची सक्ती आजही धाब्यावर बसवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button