अडीच ग्रॅम सोन्याचा न्याय तब्बल २२ वर्षांनी झाला !
शकुंतलाबाईंच्या न्यायालयीन खटल्याची कथा
उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका विवाहितेचे चाळिशीत चोरीला गेलेले मंगळसूत्र साठीनंतर परत मिळाले आहे. या साठी या महिलेने तब्बल २२ वर्षे पाठपुरावा केला. शंकुतलाबाईंनी ऊस तोडणी करून ९०० रुपयांचे अडिच ग्रॅम सोने खरेदी केले होते. पोलिसांनी चोरट्याकडून पकडलेले सोने परत घेण्यासाठी वकिलांना ५०० रूपये द्यावे लागले. कित्येक फेऱ्या पोलिस स्टेशनच्या आणि न्यायायलयाच्या त्यांना घालाव्या लागल्या होत्या.
शकुंतला विठ्ठल शिंदे या शेतकरी महिला कळंब तालुक्यातील वाकरवाडी येथील आहेत. १९९८ साली चोरी झाली तेव्हा येरमाळ्यात पोलिस चौकी होती. आज सुसज्ज पोलिस स्टेशन आहे. तत्कालीन कर्मचाऱ्यांनी वर्षभरातच गुन्ह्याचा छडा लावला होता. मंगळसूत्रासह चोरट्यांना गजाआडही केले. पुढे पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. मात्र तारखा अन सुनावण्या या न्यायालयीन प्रक्रियेतच हे मंगळसूत्र अडकून पडले. चोरट्याला अद्याप शिक्षा झालेली नाही. न्यायालयीन प्रक्रियेत दीर्घकाळ हे सोनेअडकून बसले होते. पोलिसांनी १९९८ साली झालेल्या चोरीचा तपास २०१० साली लागला होता.
१३ जुलै २०१९ ला शकुंतला बाईच्या अडीच ग्रॅम मंगळसुत्राचे प्रकरण न्यायालयीन सुनावणीला आले. त्यानंतर कळंब न्यायालयात लोक अदालत झाली. तेव्हा याच लोक अदालतीने महिलेस मंगळसूत्र परत करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले. त्यानंतर मंगळवार २ मार्च रोजी शकुंतला शिंदे यांना त्यांच्या पतीच्या उपस्थितीत पोलिसांनी परत दिले. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी शकुंतलाबाईंना वकिलाची फीस ५०० रूपये द्यावी लागली. कित्येक फेऱ्या पोलिस स्टेशनच्या आणि न्यायायलयाच्या कराव्या लागल्यात. यामुळे राज्यातील व्यवस्था कशी काम करते याचा उत्तम नमुना पाहण्यास मिळाला आहे.