चेन्नई: IND vs ENG ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर शानदार कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. पण चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा २२७ धावांनी पराभव झाला. अखेरच्या दिवशी भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा खराब कामगिरी केली. भारताचा दुसरा डाव फक्त १९७ धावात संपुष्ठात आला. या विजयासह इंग्लंडने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. करोनानंतर भारतात झालेल्या या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालाय. दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना चेन्नईतील याच मैदानावर १३ फेब्रुवारीपासून सूरू होणार आहे.
कसोटी संघाचा नियमीत कर्णधार म्हणून विराट कोहली परतल्यावर भारताने पुन्हा पराभव पत्करला आहे. कोहलीचा याच्याआधीचा सामना अॕडिलेड येथेही भारताने गमावला होता. कोहलीच्या नेतृत्वात भारताने मागचे चार कसोटी सामने गमावले आहेत. दूसरीकडे इंग्लंडचा कर्णधार जो रुटचा आशियातील सहा सामन्यांतला हा सहावा विजय आहे.
विराटने पराभव टाळण्यासाठी आज प्रयत्नांची शिकस्त केली. त्याने अडीच तास एक बाजू लावून धरताना 72 धावा केल्या पण दुसऱ्या टोकाला पाय रोवून खेळणारा साथीदार न मिळाल्याने सामना वाचविण्यात त्याला अपयश आला.
भारतात खेळल्या गेलेल्या मागच्या 50 कसोटी सामन्यांतला भारताचा हा केवळ पाचवा पराभव आहे. याच्याआधी 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुध्दची नागपूर कसोटी, इंग्लंडविरुध्दची 2012 ची मुंबई कसोटी, त्याच वर्षी इंग्लंडविरुध्दची कोलकाता कसोटी आणि 2017 मध्ये आॕस्ट्रेलियाविरुध्दची पूणे कसोटी भारताने गमावली होती. गेल्या 10 वर्षात भारताने मायदेशी इंग्लंडविरुध्द तीन आणि आॕस्ट्रेलियाविरुध्द एक कसोटी सामना गमावला आहे.
भारताची धावसंख्या 179 असताना बेन स्टोक्सने विराट कोहलीचा त्रीफळा उडवला आणि भारताचा प्रतिकार अडवला.त्याआधी उपाहाराआधी जेम्स अँडरसनने तीन गडी बाद करुन भारताला अडचणीत आले होते. आजच्या आपल्या पहिल्याच षटकात दोन गडी बाद करुन त्याने इंग्लंडच्या विजयाचा मार्ग मोकळा केला होता. अँडरसनने 17 धावात तीन गडी बाद केले तर जॕक लीचने 76 धावात चार गडी बाद केले.
