सात वर्षाच्या बंदीनंतर क्रिकेट मैदानावर परतलेल्या एस श्रीसंत ला एक मोठा झटका बसला आहे. गेल्या महिन्यात बीसीसीआयने आयोजित केलेल्या सैय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीत श्रीसंतने केरळचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्याने आयपीएलच्या १४व्या हंगामाच्या लिलावासाठी देखील अर्ज केला होता. पण आयपीएल खेळण्याच्या श्रीसंतच्या स्वप्नांना मोठा धक्का बसला आहे.
सर्वसाधारणपणे आयपीएलमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंना नोंदणी करणं आवश्यक असतं. त्यानुसार श्रीसंतने आपलं नाव नोंदवलं. या मोसमासाठी एकूण 1 हजार 97 खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं होतं. नाव नोंदवल्यानंतर आयपीएल मॅनेजमेंट अर्ज केलेल्या एकूण खेळाडूंपैकी आवश्यक खेळाडूंची यादी जाहीर करते. आयपीएलने ही यादी 11 फेब्रुवारीला जाहीर केली. यामध्ये लिलाव प्रक्रियेसाठी 1 हजार 97 खेळाडूंपैकी292 खेळाडूंची निवड करण्यात आली.
आयपीएलच्या लिलावासाठी श्रीसंतने नाव नोंदणी केली होती. त्याने स्वत:ची बेस प्राइस ७५ लाख इतकी ठेवली होती. याआधी किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये भाग घेतलेल्या श्रीसंत टीम इंडियाच्या २००७ आणि २०११च्या विजेत्या संघात होता. पण या वर्षी आयपीएल लिलावाच्या खेळाडूंच्या अंतिम यादीत त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.
सात वर्षानंतर मैदानावर आलेला श्रीसंत आता ३८ वर्षाचा आहे. पण त्याने अद्याप फिटनेस मिळवलेला नाही. या शिवाय त्याची फिल्डिंग ही देखील चिंतेचा विषय आहे. टी-२० क्रिकेटमध्ये फिल्डिंग ही महत्त्वाची ठरते. या कारणामुळेच बीसीसीआयने आयपपीएलच्या अंतिम यादीत त्याला जागी दिली नाही.
श्रीसंत काय म्हणाला?
“मी आपल्याशी संवाद साधतोय. मला तुमच्याकडून सहानभूती नकोय. माझी निवड झाली नाही. पण मी यामुळे खचून जाणार नाही. मला फक्त तुमचा पाठिंबा आणि प्रेम हवयं, यानेच मी आनंदी आहे. यावेळेस माझी निवड झाली नाही. पण मी पुढच्यावेळेस आणखी जोमाने तयारी करेन. मी सातत्याने प्रयत्न करेन”, असं श्रीसंत म्हणाला. श्रीसंतने इंस्टाग्रामवरुन आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळेस त्याने याबाबतची प्रतिक्रिया दिली.
