Maharashtra GovPoliticsमुंबई

उद्धव ठाकरेंनी राजभवनावर गुपचूप पाठवला आपला खास दूत, चर्चेला उधाण

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अन राज्य सरकार यांच्यात कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावर वाद झाल्याच्या बातम्या सातत्याने झळकत आहेत. नुकतेच अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून राज्यसरकार आणि राज्यपाल यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. विशेषतः या काळात शिवसेना आणि राज्यपाल यांच्यात अनेकदा खटके उडाले आहे.

मात्र काल अचानक कोणालाही खबर न होऊ देता राज्यपालांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना रविवारी राजभवनावर बोलावून घेतले होते. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कुणालाही न सांगता नार्वेकर याना राजभवनावर पाठवले होते. अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि येऊ घातलेली विधानपरिषद निवडणूक यांसदर्भात ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

उद्धव ठाकरे यांचे खास विश्वासू मिलिंद नार्वेकर यांना राजभवनावर पाठवण्यात आल्याचे शिवसेनेत कुणालाही माहित नव्हते. रविवारी दुपारी चारच्या सुमारास नार्वेकर राजभवनात दाखल झाले. राज्यपालांशी त्यांच्याशी सुरू असलेली चर्चा पूर्ण होण्यापूर्वीच रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या मातोश्री चंद्रकांता गोयल यांच्या निधनानंतर त्यांची भेट घेण्यासाठी राज्यपाल निघणार होते. अपूर्ण राहिलेली चर्चा पूर्ण करण्यासाठी त्यांनी नार्वेकरांना गाडीत बसा अन चला, असे सांगितले.

पियुष गोयल यांच्या मातोश्री भाजपच्या आमदार तर होत्याच, पण भाजप शिवसेना युतीची बैठक सर्वप्रथम गोयल यांच्याच घरी झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंबंधात श्रद्धांजली अर्पण करताना हे स्मरणही ट्विटमध्ये केले होते. त्यामुळे नार्वेकरही राज्यपालांसमवेत गोयलांच्या घरी गेले होते. या प्रसंगाचे छायाचित्र राज्यपाल कार्यालयाने प्रसिद्ध केल्याने शेजारी उभ्या असलेल्या मिलिंद नार्वेकरांची छबी समोर आली. शिवसेनेतील बड्या नेत्यांनाही या फोटोमुळेच मिलिंद नार्वेकर राजभवनात पोहोचले होते, याची माहिती पडली. आता राज्यपालांनी भेटीत तसेच प्रवासात नार्वेकरांना नेमके काय सांगितले, यावर चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button