पंढरपूर (Pandharpur)

चंद्रभागा नदीवरील घाटाची भिंत कोसळली, सहा जणांचा मृत्यू

पंढरपूर: मागील चार दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडत आहे. सोमवारी रात्रीपासून पावासाचा जोर वाढल्यामुळे पंढरपुरात पूर आला. त्यातच चंद्रभागा नदी तीरावर नव्याने बांधण्यात आलेल्या कुंभार घाटाची भिंत आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कोसळली. या घटनेत ६ जणांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

पाऊस सुरू असल्याने या भिंतीच्या आडोशाला काही लोक उभे होते. यामुळे मोठ्या संख्येने लोक या दगडाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. खास करून काठावर भीक मागणारे भिकारी या भिंतीच्या आडोशाला होते. भिंत कोसळतच लोकांनी आक्रोश केला. ढिगाऱ्याखाली किती लोक दाबले गेले याची चिंता असून मदत व बचाव कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले मुख्याधिकारी अनिकेत मानूरकर हे जेसीबी व रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या काठावर नवीन घाट बांधून सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. जलसंपदा विभागाकडून हे घाट बांधणीचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. चुना वापरून दगडाचे बांधकाम केलेले आहे. मात्र कुंभार घाटावर असणार हे बांधकाम तिथेच राहणाऱ्या काही लोकांच्या अंगावर कोसळले. यामध्ये आत्तापर्यंत सहा जणांचे मृतदेह मिळाले आहेत.

प्रशासनाकडून अद्यापही शोधकार्य सुरू आहे. कुंभार घाटा जवळील या नवीन घाट सुशोभीकरणाच्या कामाच्या जवळच या लोकांनी छोट्या छोट्या झोपड्या टाकल्या होत्या. त्या ठिकाणी ते फुल विक्री प्रसाद विक्री नारळ विक्रीचा व्यवसाय करत होते. आणि त्यावरच आपली गुजराण करत होते. मात्र आज दुपारी दीडच्या सुमारास मुसळधार पावसाने नवीन घाटाचे बांधकाम कोसळले वीस फूट उंचीची भिंत या लोकांच्या अंगावर कोसळली. यामध्ये सहा जणांचे मृतदेह सापडले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button