Festival (फेस्टिव्हल)Maharashtra Govमुंबई

कोरोना, सॅनिटायजर त्यात फटाके त्यामुळे यंदाची दिवाळी फटाक्याविना?

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायजर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी सरकार नागरिकांना उद्युक्त करत आहे. त्यातच आता लवकरच दिवाळसण येऊ घातला आहे. दिवाळीला सर्वात मोठे आकर्षण म्हणजे फटाके. फटाक्यांविना दिवाळी अपुर्ण मानली जाते. मात्र, यंदा मुंबई महापालिका दिवाळीला फटाक्यावर बंदी आणण्यासाठी विचारविनिमय करत असल्याची माहिती आहे.

सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणे यावर यंदा निर्बंध घालण्यात येणार असल्याचा विचार सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

दिवाळीच्या  काळात मुंबईत सार्वजनिक ठिकाणी, समुद्रकिनाऱ्यांवर फटाके फोडण्याची परंपरा आहे. मात्र, याबाबत मुंबई महापालिका लवकरच मोठा निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या वर्षीची दिवाळी साजरी करताना मोठ्या आवाजाचे, मोठ्या आकाराचे, आकाशात उडणारे फटाके फोडू नका. सोबतच फटाके फोडताना सॅनिटायझर जवळ बाळगू नका. हाताला सॅनिटायझर लावू नका. अन्यथा आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असे आवाहन मुंबई महापालिका अग्निशमन दलाच्या वतीने मुख्य अग्निशमन दल अधिकारी शशिकांत काळे यांनी केला आहे

दुसरीकडे, सध्या कोविड-19 चा काळ असल्यानं प्रदुषणात भर पडून लोकांना त्रास होवू नये, यामुळे फटाके विक्री आणि फोडण्यावर बंदी आणावी, अशी मागणी मुंबईसह राज्यभरात जोर धरु लागली आहे.

फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ होते. त्याचा त्रास कोरोना रुग्णांना होऊ शकतो. त्यामुळेच यंदाच्या दिवाळीत फटाके विक्रीवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. फटाकेमुक्त दिवाळीसाठी राज्याचा आरोग्य विभाग आग्रही असल्याचं समजतं. त्यामुळेच आरोग्य विभागानं याबद्दलचा प्रस्ताव तयार केला आहे. तो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास यंदा राज्यात फटाके विक्रीवर बंदी असेल.

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्ससोबत फटाकेमुक्त दिवाळीबद्दल चर्चा सुरू आहे. यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी, यासाठी राजेश टोपे प्रयत्नशील आहेत. तसे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले आहेत. ‘दिवाळीचा सण जवळ आला आहे. कोरोनाचं संकट असल्यानं यंदाची दिवाळी फटाकेमुक्त कशी करता येईल, याचा विचार आपण करायला हवा. यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळाकडे आग्रह धरणार आहे,’ असं टोपे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button