महाराष्ट्र सरकार उत्तर द्या! मुंबई पोलिसांनी 50 दिवसांत काय केले – बिहार डीजीपी
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी बिहारच्या पोलिस महासंचालकांनी मुंबई पोलिसांच्या कामावर संशय व्यक्त करत महाराष्ट्र सरकारला प्रश्नांच्या कटघरात उभे केले आहे. सुशांतची आत्महत्या होऊन आता 50 दिवस झालेत या पन्नास दिवसांत मुंबई पोलिसांनी काय केले असा संतप्त प्रश्न बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी केला आहे.
मुंबई पोलिसांनी आयपीएस अधिका-याला जबरदस्तीने अलग ठेवले आहे. जर महाराष्ट्र शासनाचा पोलिसांवर एवढाच अभिमान असेल तर सुशांतसिंहराजपूत यांच्या निधनानंतर त्यांनी 50 दिवसांत काय केले ते सांगा. मुंबईने आमच्याशी सर्व संपर्काचे मार्ग बंद केलेत. यातून काय समजायचे म्हणजे नक्कीच काही तरी चुकीचे शिजत आहे असा आरोप बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी केला आहे.
ते म्हणाले, महाराष्ट्राचे गृहसचिव फोन उचलत नाहीत, बिहार पोलिसांचे फोनही घेत नाहीत. पूर्ण संवाद मुंबई पोलिसांनी थांबवला आहे”.
“सुशांत सिंह राजपूतला न्याय देण्यासाठी, तपासासाठी मुंबईला आलेले पाटणा शहराचे एसपी विनय तिवारी यांना विलगीकरणात का ठेवले? एअरपोर्टवर इतके जण येतात, त्यांना विलगीकरणात ठेवलं जातं का? लोकांच्या मनातील शंका दूर करा” असेही गुप्तेश्वर पांडे म्हणाले.
दुसरीकडे, पाटणाचे पोलिस महानिरीक्षक संजय सिंह यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. बिहारचे एसपी विनय तिवारी यांना गृह विलगीकरणातून सोडण्याची विनंती करण्यात आली आहे.
तर, “सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या बिहारच्या अधिकाऱ्यांना क्वारंटाईन ठेवण्याची खेळी चुकीची आहे. यातून काहीतरी संशयास्पद असल्याचे दिसून येते. एनआयए, अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. आता वेळ आली आहे, केंद्राने हस्तक्षेप करावा” अशी मागणी बिहारमधील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केली.


