१० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
मुंबई: राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा होणार की नाही अशी शंका निर्माण झाली असतानाच शिक्षण विभागानं अखेर शुक्रवारी वेळापत्रक जाहीर केलं आहे. संभाव्य वेळापत्रकासाठी २२ मार्चपर्यंत लेखी स्वरुपात पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या सर्व सुचनांचा विचार करुन अखेर इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोविड-१९ च्या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करुनच परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
एसएस (१० वी) बोर्डाच्या लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मेच्या दरम्यान होणार आहे, असं राज्याच्या शिक्षण मंडळानं जाहीर केलं आहे. इयत्ता एचएचसी (१२ वी) लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत १० वी आणि १२ वीच्या परीक्षा घेण्यात येतात.