मुंबईची लाईफलाईन सुरु करावी, भाजप खासदारांची संसदेत मागणी!
मुंबई: मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल सामान्य नागरिकांसाठी सुरू करावी यासाठी मनसेने सविनय कायदेभंग आंदोलन केले असतानाच आता भाजपनेही हा मुद्दा संसदेत उपस्थित केला आहे. भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी मुंबईची लोकल सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी आज संसदेत केली आहे. देशात अनलॉक-४ ची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबईत हजारो लोक लोकलनेच प्रवास करतात. जूनमध्ये मुंबईची लोकल सुरू झाली. मात्र, सरकारी कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात सरकारकडून देण्यात आली आहे. त्यामुळे इतर हजारो मुंबईकरांची कोंडी झाली आहे. त्यामुळे मुंबईची लोकल सेवा पूर्ववत करून संपूर्ण मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी. जेणेकरून कामावर जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी मागणी मनोज कोटक यांनी लोकसभेत केली आहे.
यावेळी कोटक यांनी त्यांच्या मतदारसंघातील भांडूप आणि विक्रोळी मतदारसंघाकडेही सभागृहाचं लक्ष वेधलं. विक्रोळी आणि भांडूपमध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारी कर्मचारी राहतात. मात्र या दोन्ही स्थानकांवर लोकल थांबत नाहीत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत कार्यरत असूनही येथील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करता येत नाही. परिणामी या कर्मचाऱ्यांना बसेस किंवा खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून त्याचा खर्च या कर्मचाऱ्यांना परवडेनासा झाला आहे. त्यामुळे या दोन्ही स्थानकांवर लोकल थांबविण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. मनसेपाठोपाठ आता भाजपनेही मुंबईच्या लोकलचा मुद्दा हाती घेतल्याने राज्यसरकार त्यावर काय निर्णय घेते? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

