BJPCongressFarmersMaharashtra Govमुंबईराजकारणशहर

चारा छावण्यांना तात्काळ मुदतवाढ द्या, अन्यथा महाजनादेश यात्रा अडवू – नाना पटोले

पोळा हा शेतक-यांचा सर्वात मोठा सण आहे. पण दुर्देवाने राज्याच्या काही भागात भीषण दुष्काळी परिस्थीती आहे. मराठवाड्यातल्या शेतक-यांवर तर चारा छावणीत पोळा साजरा करण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत असून पाणी आणि चा-याची भीषण टंचाई आहे. चारा छावण्यांची मुदत उद्या संपत आहे. सरकारने तात्काळ चारा छावण्यांना मुदतवाढ द्यावी अन्यथा १ सप्टेंबर रोजी बळीराजा आणि त्याच्या पशुधनाला सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा अडवू, असा इशारा प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले यांनी दिला आहे.
या संदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, राज्यातला शेतकरी सध्या अत्यंत अडचणीत असून अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकटाचा सामना करत आहे. राज्याच्या काही भागात पूरस्थिती आहे तर काही भागात भीषण दुष्काळ आहे.

मराठवाड्यात भीषण पाणी आणि चारा टंचाई आहे. पाऊस पडल्यावर सर्व काही सुरळीत होईल या अपेक्षेने सरकारने दुष्काळनिवारणासाठी काही उपाययोजना केल्या नाहीत. अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच सरकारने चारा छावण्या बंद केल्या होत्या पण सामाजिक व राजकीय कार्यकर्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने चारा छाववण्यांना ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदत आज संपत आहे पण दुर्देवाने अद्यापही मराठवाड्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे सरकारने तात्काळ चारा छावण्यांना मुदतवाढ देऊन मागणी प्रमाणे चारा छावण्या सुरु कराव्यात. तसेच पूरग्रस्त भागातही चा-याचा प्रश्न गंभीर बनला आहे तिथेही मागणीप्रमाणे चारा छावण्या द्याव्यात अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button