चिंताजनक! कोरोनावरील लस चार ते पाच वर्षांनी मिळणार?
पुणे: भारतात कोरोनाने पायपसरायला सुरुवात केल्यानंतर या महामारीला आळा घालणारी लस कधी येणार याची सर्वच जण प्रतीक्षा करीत होते. अनेक राजकीय नेत्यांनी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी कोरोनावरील लस ही २०२० वर्षाच्या अखेरपर्यंत येईल असे सांगितले होते. त्यामुळे कोरोनावरील लस ही यावर्षा अखेरपर्यंततरी भारतातील प्रत्येक नागरिकाला मिळेल असा समज सामान्य नागरिकांचा झाला आहे. परंतु आता सर्वांच्याच चिंतेत वाढ करणारी बातमी समोर येत आहे.
पुण्यातील सिरम इंस्टीट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी कोरोना लसी संधर्भात दिलेल्या माहितीनुसार कोरोना प्रतिबंदक लसीचे सध्या होत असलेले उत्पादन हे पुरेसे नाही. ही लस जगभरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी अजून चार ते पाच वर्ष वाट पाहावी लागणार आहे. त्यापुढे ते म्हणाले की, भारतात मोठ्याप्रमाणावर लस साठवण्यासाठी शीतगृहांची संख्या फार कमी आहे तसेच या लसींची सुरक्षितपणे वाहतूक करण्याची नीटशी व्यवस्था उपलब्ध नाही. यासर्व गोष्टी पाहता २०२४ सालापर्यंत देशामध्ये कोरोना लसीचा तुटवडा जाणवत राहणार आहे. पुनावाला म्हणाले की, गोवराच्या प्रतिबंधासाठी ज्याप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात येतो त्याच प्रमाणे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम हाती घ्यायला हवा. कोरोना लस तयार करण्याकरीता प्रयत्नशील असलेल्या पाच महत्वाच्या कंपन्यांशी भारताने एक अब्ज डोसचे उत्पादन करण्याचा करार केला आहे. तसेच रशियातील गॅमेलिया रिसर्च इन्स्टट्यूटने विकसित केलेल्या लसीचे उत्पादन करण्यासाठी सिरम इंस्टीट्युटने करार केला आहे.
सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी म्हटले की सध्या जे लोक ऑक्टोबर पर्यंत लस उपलब्ध होईल असे म्हणतात त्यांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही. तसेच अमेरिका, यूरोप यासारख्या देशांनी लस उत्पादनासाठी मोठी ऑर्डर दिल्यामुळे इतर देशांकरीता लसींचे उत्पादन करण्यास आणखी उशीर होणार आहे.


