मनोरंजन

अभिनेता सयाजी शिंदे यांच्या गडांवर हिरव्या मशाली

मुंबई: अभिनेते सयाजी शिंदे मागील अनेक वर्षांपासून वृक्षारोपण आणि त्यांच्या संवर्धनासाठी काम करत आहेत. वेगवेगळे उपक्रम राबवत  ते लोकांना झाडांचे महत्त्व समजून देण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवजयंतीनिमित्ताने प्रत्येक गडावर ४०० झाडं लावण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. सोशल मिडीयावर त्यांनी ही माहिती दिली.

 सयाजी सांगत आहेत की, ‘सह्याद्रीच्या द-याखोखोऱ्यात स्वराज्याचं स्वप्न पाहिलेले माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज. सोबतीला मावळे होते. या मावळ्यांना आणि राजांना झाडांनीही साथ दिली. सह्याद्रीच्या प्रत्येक झाडांचेही स्वराज निर्माण व्हावं ही इच्छा होती, पण पूर्ण सह्याद्री बोडकी करून टाकलीय आपण. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, झाडं म्हणजे रयतेची लेकरं, असं तळमळीनं सांगणाऱ्या महाराजांचं आपण ऐकणार आहोत की नाही ? आपण शिवरायांचे मावळे आहोत. येत्या शिवजयंतीला प्रत्येक गडावर ४०० झाडे लावण्याचा संकल्प आपण करूयात. गडावर मशाल घेऊन जाऊ, पण हिरवी मशाल… झाडांची मशाल… कारण झाडाशिवाय गडाला शोभा नाही. जय शिवराय’.

तसच शेवटी सर्व शिवभक्तांना गड किल्ल्यांवर वृक्षारोपणासाठी संपर्क क्रमांकही देण्यात आले आहेत. सयाजी यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून शिवभक्त आणि चाहते या मोहिमेत सहभागी होण्यासाठी उत्सुकता दाखवत आहेत. 

यापूर्वीही सयाजी यांनी वृक्षसंवर्धन आणि वृक्ष लागवडीसंदर्भात मोठ्या प्रमाणात कामं हाती घेतली होती. झाडे लावणे, वाढवणे, त्यांचे संवर्धन करणे याचसोबत त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. वृक्ष बँक, वृक्ष सुंदरी पुरस्कार, निसर्गराजा पुरस्कार, सेल्फी विथ ट्री यांसारख्या उपक्रमांतून निसर्गाबद्दल जनजागृतीची करण्याचे काम त्यांनी केले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button