EnvironmentMaharashtra Govपालघरमुंबई

पालघर किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात

पालघर : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावासोबतच महाराष्ट्रासमोर नवं संकट उभं ठाकलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ 3 जून म्हणजे उद्या पश्चिम किनारपट्टी भागावर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर पालघर किनारपट्टीवरील सातपाटी, मुरबे नवापूर केळवे भागात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, पालघर जिल्ह्यातील अजून १३ मच्छिमार बोटी समुद्रात असून १५६ मच्छिमार खलाशी या बोटींमध्ये आहेत. तर उर्वरित बोटी लवकरच परतण्याचा मार्गावर असल्याची माहिती पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले असून समुद्र काठावर असलेल्या नागरिकांना एनडीआरएफ आणि शासकीय यंत्रणेच्या मार्फत सूचना देण्यात येत असून येथील नागरिकांना इतरत्र हलवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

पुढील काही दिवस पालघर, ठाणे, मुंबई रत्नागिरी, रायगडमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात आज एनडीआरफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. तर सध्या स्थानिक प्रशासनाच्या मदतीने समुद्र काठच्या ठिकाणांची पाहणी करण्यात येत आहे. एनडीआरएफ प्रमुख बी शिवप्रसाद राव हे आपल्या तुकडीसह सध्या पाहणी करत आहेत. तर तटरक्षक दल, मेरीटाईम बोर्ड प्रशासन सज्ज झालं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button