Maharashtra GovShivSenaठाणे महानगरपालिकाराजकारण

ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांना उपस्थित राहण्यासाठी आयुक्त महोदयांना निर्देश द्या! ठाणे – महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

प्रति,
आदरणीय ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब
मुख्यमंत्री-महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई.

यांसी, सस्नेह नमस्कार |

विषय :- ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांना उपस्थित राहण्याबाबत आयुक्त महोदयांना निर्देश होणेबाबत.

आदरणीय महोदय,

आपल्या लोकशाहीत देशाच्या समतोल विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना अनन्य साधारण महत्व आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून शहराचे हित लक्षात घेऊन शहराच्या विकासाचे निर्णय घेण्याची जबाबदारी लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी अर्थात नगरसेवक पार पाडत असतात. या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेने पार पाडणे अपेक्षित असते. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या समन्वयातून शहराचे हित जोपासण्याचे काम होत असते.
देशात ज्याप्रमाणे संसद आणि राज्यात विधीमंडळ या सर्वोच्च सार्वभौम संस्था आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेत सर्वसाधारण सभा (जनरल बॉडी) ही त्या शहराची सर्वोच्च सार्वभौम संस्था असते. शहरवासीयांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचे आणि त्यांच्या मनातील शंकांना वाचा फोडण्याचे काम नगरसेवक सर्वसाधारणस सभेच्या माध्यमातून करत असतात. या आशा-आकांक्षांनुसार काम करण्याचे आणि नगरसेवकांच्या माध्यमातून जनतेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी प्रशासनाची आणि प्रशासनाचे प्रमुख या नात्याने आयुक्तांची असते.

परंतु ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री.संजीव जयस्वाल सर्वसाधारण सभांना वारंवार गैरहजर रहात असल्यामुळे सभागृहाचा सार्वभौम अधिकार डावलला जात असल्याची ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांची तीव्र भावना झाली आहे. तसेच प्रशासनातील कुठल्याही अधिकाऱ्याला सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याची मनाई केली जात असल्याचेही प्रकार निदर्शनास आले आहेत.

सभागृहात एखाद्या नगरसेवक अथवा नगरसेविकेने प्रश्न विचारलल्यास त्यांच्या संदर्भात अत्यंत मानहानीकारक भाषेचा वापर करुन त्यांचा अवमान केला जातो. तसेच सर्व अधिकाऱ्यांना घेवून सभागृहाबाहेर निघून जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. बहुतेक वेळा आयुक्त महापालिकेत उपस्थित असून देखील सर्वसाधारण सभेत उपस्थित रहात नाही. वरील प्रमाणे नमूद केल्यानुसार एखाद्या नगरसेवकांने ठाण्यातील विकासका संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यास आयुक्त स्वत: सभागृहात उपस्थित राहून नगरसेवक किंवा नगरसेविकांना उलट-सुलट प्रश्न विचारतात. व विकासकांसंदर्भात जरी नगरसेवकांनी प्रश्न विचारलेले असलेतरी वैयक्तिकरित्या नगरसेवकांची चौकशी करुन त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. व नगरसेवक चोर असल्याचा संभ्रम नागरिकांमध्ये पसरविण्याचा प्रयत्न आयुक्तांकडून सातत्याने होत आहे. सर्वसाधारण नागरिकांच्या हितार्थ आणलेल्या प्रस्तावांना सभागृहात अनुपस्थित राहणे व फक्त विकासकांसंदर्भात आलेल्या प्रश्नांबाबत सभागृहात आयुक्तांनी उपस्थित राहणे योग्य वाटते का? या सर्व प्रकारामुळे ठाणे शहराच्या विकासावर विपरीत परिणाम होत असून, अनेक कामे उदा.पावसाळयात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविणे, झोपडपट्टीमधील शौचालयांच्या दुरुस्तीची कामे, महापालिका शाळांची दुरावस्था इत्यादी अनेक प्रश्न मार्गी लावणेस विलंब होत आहे, प्रशासनाच्या या बेपर्वाईचा जाब जनता अंतिमत: लोकप्रतिनिधीनाच विचारत असते.

ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांना उपस्थित राहण्यासाठी आयुक्त महोदयांना निर्देश द्या! ठाणे - महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांना उपस्थित राहण्यासाठी आयुक्त महोदयांना निर्देश द्या! ठाणे – महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

मी महापौर म्हणून रुजू झाल्यानंतर गेल्या अडीच वर्षाच्या काळात 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन कार्यक्रमास एक कार्यक्रम वगळता प्रशासन प्रमुख आयुक्त हे 4 कार्यक्रमाना अनुपस्थित होते, हा महापौरांचा अवमान नसून तो राष्ट्रध्वजाचा अवमान आहे. अशा सर्व कार्यक्रमांना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य असते. परंतु आयुक्त मनमानी कारभार करत आहेत हे अनेक प्रसंगावरुन दिसून येते. सभागृहात वारंवार नगरसेवकांची मानहानी करुन, नगरसेवकांवर दबाव आणून सभात्याग करणे हे सातत्याचे झाले आहे.

तरी ठाणे शहरातील 20 लाखांहून अधिक मतदारांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांना योग्य तो मान ठेवून महानगरपालिकेच्या सार्वभौम सभागृहाचा आदर ठेवून सर्वसाधारण सभांना आयुक्त महोदयांसह सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत समजवजा निर्देश आपल्या स्तरावरुन देण्यात यावेत अशी नम्र विनंती ठाण्यातील 20 लाख नागरिकांची प्रतिनिधी या नात्याने “प्रथम नागरिक” म्हणून मी आपणास करत आहे.
धन्यवाद | आपली नम्र,
( सौ.मिनाक्षी राजेंद्र शिंदे )
महापौर, ठाणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button