‘जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाला’ – जलसंधारण मंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामात गैरव्यवहार झाले असल्याचे सिद्ध झाले. खुद्द जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी स्वतः जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाला असल्याची कबुली दिली. विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी जलसंधारणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सावंत यांनी ही माहिती दिली. जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप अनेकदा विरोधी पक्षाच्यावतीने करण्यात आले. मात्र पहिल्यांदाच या योजनेत गैरव्यवहार झाले असल्याचे सरकारने मान्य केलं. तसेच या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुप्त चौकशी सुद्धा केली असल्याची माहिती, तानाजी सावंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर देताना दिली. राज्यात असलेल्या जलयुक्ताच्या कामांबद्दल जिथे भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आल्या अशा १३०० जलयुक्त शिवाराच्या कामांची विभागीय चौकशी सुरु केली असल्याची माहिती सावंत यांनी दिली.