मुंबई : राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे बहुमताचे सरकार आहे मात्र राजकीय महत्त्वाकांक्षेपायी सचिन पायलट यांनी बंड पुकारल्यानंतर राजस्थान सरकार अडचणीत आले आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटतील का याची चाचपणी आता सुरू झाली आहे. आम्हााला सरकार पाडण्यात रस नाही हे सरकार अंतर्गत वादविवादानेच पडेल असा सुचक इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावध पवित्रा घेत विदर्बासह राज्यातील सर्व आमदारांशी संवाद वाढवल्याचे वृत्त आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या समवेत तिन्ही पक्षांच्या आमदारांशी वैयक्तिक चर्चा सुरू केली आहे. सत्ताधारी आमदारांमध्ये नाराजी, असंतोष आहे का, याची चाचपणी केली जात असल्याचे समजते.
दरम्यान याबाबत बाळासाहेब थोरात यांना विचारले असता त्यांनी या संवादाचा राजस्थान प्रकरणाशी काही संबंध नाही. ही नियमित प्रक्रिया आहे. एरव्ही अधिवेशन असते, त्यावेळी आमदारांच्या एकत्र बैठका घेऊन बोलता येते, आता तशी परिस्थिती नाही, त्यामुळे दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून बैठका घेतल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले. विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठका हेत असल्याचे सावध उत्तर थोरात यांनी दिले आहे. तरीही सावध झालेल्या आघाडीच्या नेत्यांनी तिन्ही पक्षांच्या आमदारांशी चर्चा सुरू केली आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिले आहे.


