
दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या निधीचा पुरेसा विनियोग होत नसल्याबाबत न्यायालयाने ताशेरे ओढलेले असताना अंबरनाथ नगरपरिषदेने दिव्यांगांना प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला आहे. असा मोठ्या प्रमाणात लाभ मिळवून देणारी ही बहुतेक राज्यातील पहिली नगरपरिषद असेल असे गौरवोद्गार ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काढले.
येथील सूर्योदय सभागृहात अंबरनाथ पालिकेच्या अपंग कल्याण विभागातर्फे दिव्यांगांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भव्य कार्यक्रमात 544 दिव्यांगांना विविध साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. मनीषा वाळेकर होत्या. आमदार डॉ. बालाजी किणीकर, उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे,तहसीलदार, जयराज देशमुख, उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख, सभापती शशांक गायकवाड, ऍड संदीप भराडे, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे,राष्ट्रवादीचे गटनेते सदाशिव पाटील, राष्ट्रवादी च्या महिला अध्यक्षा पूनम शेलार, भाजपच्या गटनेत्या अनिता आदक, मनसेच्या नगरसेविका सुप्रिया देसाई. नगरसेवक निखिल वाळेकर, रवी पाटील आदी अनेक मान्यवर उपस्थित होते, प्रारंभी मुख्याधिकारी देविदास पवार यांनी प्रास्तविकतर दीपक चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
शासनाच्या शब्द कोषातून अपंग हा शब्द वगळण्यात आलेला आहे. त्यांना अपंग न म्हणता त्यांना दिव्यांग म्हणायचे असा निर्णय घेण्यात आलेला आहे याचे प्रमुख कारण म्हणजे अपंगांना शारीरिक अपंगत्व असले तरी त्यांना सुप्त गुण प्राप्त झालेला असतो. म्हणून त्यांना अपंग न म्हणता दिव्यांग म्हणणं हा त्यांचा बहुमान असल्याचे आपल्या भाषणाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. अशा या दिव्यांगांना मोठ्या प्रमाणात साहित्य वाटप करून त्यांना आपल्या पायावर उभे करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे असेही त्यांनी सांगितले.
दिव्यांगांच्या सुप्तगुणांना वाव देऊन त्यांचा कौशल्य विकास करणे हे मोठे कार्य आहे. त्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. असे नियोजन अंबरनाथ नगरपरिषद करीत आहे. त्यांच्या नवीन उभारण्यात येणाऱ्या वास्तूमध्ये दिव्यांगांसाठी पाच टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय हा त्याचाच एक भाग आहे असे नार्वेकर म्हणाले.
शहराचा विकास म्हणजे मोठं मोठ्या इमारती उभारणे हा नसून शहरातील नागरिकांना नियमित सुविधा देतानाच अन्य चांगल्या योजना राबवून कौशल्य विकास करणे, त्यामाध्यमातून शहराची संस्कृती टिकवणे आणि वाढवणे महत्वाचे असते. शूटिंग रेंज पासून नाट्यगृहापर्यंत सुखसोयी हि पालिका उपलब्ध करून देत आहे. या बरोबरच दिव्यांगांच्या कौशल्य विकासासाठी परिषद कटिबद्ध असली पाहिजे. ते काम अंबरनाथ परिषदेनेकेले आहे, म्हणून लोकप्रतिनिधी आणि मुख्याधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.
दिव्यांगांसाठी विविध वस्तूंचे मोठ्या प्रमाणात वाटप करणारी अंबरनाथ पालिका हि राज्यातील पहिली पालिका असल्याने मला त्याचा अभिमान आहे असे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी अंबरनाथ शहरातील आणखी काही महत्वाच्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी आपल्या भाषणात केली. नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांचेही समयोचित भाषण झाले.


