Sportsक्रिकेटक्रीडा

सामना रंगतदार स्थितीत; भारताला विजयासाठी अद्याप ३८१ धावांची गरज

इंग्लंड संघानं दिलेल्या ४२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आहे. चौथ्या दिवसाखेर भारतीय संघानं एका गड्याच्या मोबदल्यात ३९ धावांपर्यंत मजल मारली आहे. तिसऱ्या सत्रात सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला आहे. रोहित शर्माला फिरकीपटू लीचनं त्रिफाळाचीत बाद केलं. रोहित शर्मा अवघ्या १२ धावांवर बाद झाला. चौथ्या दिवसाअखेर भारतीय संघाला विजयासाठी अद्याप ३८१ धावांची गरज आहे. अखेरच्या दिवशी भारतीय संघाला ९० षटकांमध्ये ३८१ धावा करायच्या आहेत. तर इंग्लंड संघाला ऐतिहासिक विजयासाठी ९ गडी बाद करावे लागतील. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल १५ आणि अनुभवी चेतेश्वर पुजारा १२ धावांवर नाबाद होते. चौथ्या दिवशी भारतीय संघ सामना विजयाच्या दिशेनं पावलं उचलण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे.

चौथ्या दिवशी भारतीय संघाला ३३७ धावांवर रोखल्यानंतर इंग्लंड संघानं २४१ धावांची आघाडी घेतली. इंग्लंड संघानं पहिल्या डावांत ५७८ धावांचा डोंगर उभा केला होता. दुसऱ्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर बर्न्स शून्यावर बाद झाला. त्यानंतर डॉम सिबली (१६), डॅन लॉरेन्स (१८), बेन स्टोक्स (७) आणि जो रूट (४०) एकापाठोपाठ एक जण फटकेबाजी करण्याच्या नादात बाद झाले. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या फलंदाजीवर भारतीय संघाच्या विजयाची मदार आहे. दिग्गज फलंदाजाच्या साथीला शुबमन गिल, पंत आणि सुंदर यासारखे नवखे फलंदाजही आहेत.

२०२१ वर्षाच्या सुरुवातीला गाबा कसोटी सामन्यात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत इतिहास रचला होता. तर २००८ मध्ये चेन्नई येथे इंग्लंड विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकरच्या शतकी खेळीच्या बळावर ३८७ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यामुळे अखेरच्या दिवशी भारतीय फलंदाजाकडे लक्ष असणार आहे.

चेन्नई येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघानं पहिल्या डावातील मोठ्या आघाडीच्या बळावर भारतीय संघाला विजयासाठी ४२० धावांचं आव्हान दिलं आहे. पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी असतानाही इंग्लंड संघानं फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावांत भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्यावर मारा करत इंग्लंड संघाला १७८ धावांवर रोखलं. दोन्ही डावांत इंग्लंड संघाकडे ४१९ धावांची आघाडी आहे. भारतीय संघाला विजयासाठी ४२० धावांची आवशकता आहे. दुसऱ्या डावात फिरकीपटू आर. अश्विन यानं सर्वाधिक ६ बळी घेतले. नदीमला दोन तर बुमराह आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button