मध्य रेल्वेवरील कांजुरमार्ग ते कुर्ला स्थानकादरम्यान लोकलवर दगडफेकीच्या घटना वाढत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे राखीव पोलीस दलातील 24 जणांचे पथक मध्य रेल्वेने स्थापन केले. हे पथक एक किलोमीटरच्या अंतरावर गस्त घालणार असून या घटना रोखण्यासाठी सीसीटीव्ही लावण्यासह स्थानिकांची मदतही घेण्यात येणार आहे.
प्रवाशांनी देखील अशा दगड फेकीच्या घटनांबाबत जागरुक राहावे यासाठी मोहीम राबवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त के. के. अश्रफ यांनी सांगितले. लोकलच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशांवर खूप वेगाने दगड लागतो. त्यामुळे ती व्यक्ती पडून त्या गंभीर जखमी होण्याची भीती असते. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते समीर झवेरी यांनी व्यक्त केल आहे.

