डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड !
आरोपींना तत्काळ अटक करा; देवेंद्र फडणवीसांची मागणी
मुंबई :- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.
आज संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे.
या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या प्रकरणी निंदा केली आहे. आरोपींना तत्काळ अटक केली जावी, अशी मागणी फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली.
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या 'राजगृह' यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे.
मी स्वतः मा. भीमराव (दादासाहेब) आंबेडकरजी यांच्याशी फोनवर चर्चा केली तसेच…
(1/2)— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 7, 2020
फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्ह असून आरोपींना तत्काळ अटक व्हावी, अशी आमची मागणी आहे. मी स्वतः मा. भीमराव (दादासाहेब) आंबेडकरजी यांच्याशी फोनवर चर्चा केली. तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

