मुंबईसेलिब्रिटी

पोटभर हसवणारा चित्रपट तारा निखळला ;ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचं निधन

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते, विनोदवीर जगदीप म्हणजेच सैयद इश्तियाक अहमद यांचं वृद्धापकाळानं बुधवारी मुंबईत निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. त्यांची शोले या चित्रपटातील सुरमाँ भोपाली साकारलेली ही भूमिका फार गाजली होती.

शोले चित्रपटातील त्यांची सुरमा भोपालीची भूमिका फार गाजली. या चित्रपटानंतर अनेक जण त्यांना सुरमाँ भोपाली म्हणूनच ओळखू लागले होते. जावेद जाफरी आणि नावेद जाफरी हे त्यांचे पुत्र आहेत. ते दोघं आपल्या नृत्य कौशल्यासाठी आणि अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत.

कठोर संघर्ष केला की त्याचे फळ मिळते. हे आजवर अनेक वेळा अनेकांच्या उदाहरणांवरून सिद्ध झाले आहे. काल रात्री निधन झालेले प्रख्यात विनोदी अभिनेते जगदीप हे या संघर्षातून तावून निघालेले शंभर नंबरी सोने होते. गरीबी असताना कोणतेही वाईट काम करून पैसे कमवणार नाही हे त्यांनी ठरवले आणि त्यावर अंमलही केला.

जगदीप यांचे नाव घेतले की सगळ्यांच्या डोळ्यासमोर सर्वप्रथम सुरमा भोपालीची भूमिकाच येते. या भूमिकेने त्यांना सातासमुद्रापार लोकप्रियता मिळवून दिली. ही किमया जेवढी लेखक सलीम-जावेद यांची होती तेवढीच त्यांच्या अभिनयाचीही होती. जगदीप यांनी सूरमा भोपाली असा काही सादर केला की तो थेट प्रेक्षकांच्या मनातच जाऊन बसला. केवळ सूरमा भोपालीच नव्हे तर जगदीप यांनी ज्या सूरमा भोपालीने ओळख मिळवून दिली. त्याच नावाच्या चित्रपटाची स्वतः निर्मिती केली आणि त्याचे दिग्दर्शनही केले.

सैयद इश्तियाक जाफरी हे जगदीप यांचे खरे नाव. २९ मार्च १९३९ ला तेव्हाचा सेंट्रल प्रॉविन्स (म्हणजे आताचा मध्यप्रदेश) मधील दतिया गावात एका बॅरिस्टरच्या घरात त्यांचा  जन्म झाला. देश स्वतंत्र झाला त्याच वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. फाळणीमुळे अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लिम वाद होत होते. अशा स्थितीत जगदीपच्या आईने आपल्या कच्च्याबच्च्यांना घेतले आणि सर्व सोडून मुंबईकडे कूच केले. मुंबईला येऊन त्यांची आई आई एका अनाथ आश्रमात जेवण बनवण्याचे काम करू लागली.

घरची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असल्याने जगदीप यांनी लहानपणीच आईची मदत करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचवेळेस एक वेळ उपाशी राहीन परंतु वाईट काम करणार नाही असा निश्चयही केला. आणि आपल्या या निश्चयाला जागत रस्त्यावर कंगवे विकण्यापासून ते पतंग विकण्यापर्यंत अनेक कामे केली. याच दरम्यान योगायोगानेच त्यांचा  चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. बी. आर. चोप्रा अफसाना नावाचा चित्रपट तयार करीत होते आणि एका दृश्यामध्ये काही मुलांची गरज होती. तेव्हा चित्रपटांसाठी एक्स्ट्रा कलाकार पुरवणा-याने काही मुलांसोबत जगदीपलाही आणले. तीन रुपये मिळतील असे सांगितल्यानेच जगदीप तयार झाला होता. दिवसभर वस्तू विकून केवळ दीड रुपया मिळत असे. परंतु इथे फक्त टाळी वाजवण्यासाठी तीन रुपये मिळणार होते म्हणून त्याने काम करण्याचे मान्य केले आणि येथूचच जगदीप यांचा बॉलीवुडचा प्रवास सुरु झाला. मास्टर मुन्ना या नावाने मग अब दिल्ली दूर नहीं, मुन्ना, आरपार अशा काही चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केले. विमल रॉय यांच्या दो बिघा जमीनपासून जगदीप यांना ओळख मिळवून दिली. भाभी, बरखा, बिंदिया या चित्रपटात जगदीप यांनी नायक म्हणूनही काम केले. परंतु त्यांचे चित्रपट काही यशस्वी झाले नाहीत. ब्रह्मचारी चित्रपटात त्यांनी विनोदी भूमिका साकारली आणि तेथून विनोदी भूमिकांचा सिलसिला सुरु झाला.

जगदीप यांनी जेव्हा चित्रपटसृष्टीत विनोदी अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली तेव्हा मेहमूद, जॉनी वॉकर, राजेंद्रनाथ असे अनेक मातब्बर विनोदी अभिनेते होते. त्यांच्यासोबत राहून स्वतःचे वेगळे स्थान त्यांनी निर्माण केले होते.

जगदीप यांनी एकदा एक किस्सा सांगितला होता. पी. एल. संतोषी यांच्या १९५७ मध्ये आलेल्या हम पंछी एक डाल के चित्रपटात मी एका तरुणाची भूमिका साकारली होती. अर्थात मी ही तेव्हा १८ वर्षांचाच होतो. माझी ती भूमिका पाहून तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू खूप प्रभावित झाले होते. त्यांनी चक्क त्यांचा वैयक्तिक स्टाफ मला भेट म्हणून दिला. मला वाटत नाही अशा प्रकारचे प्रेम अन्य कुठल्या कलाकाराच्या वाट्याला आले असेल.

जगदीप यांनी एकून तीन लग्ने केली. नावेद आणि जावेद ही त्यांची दोन मुले बॉलीवुडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करून आहेत. त्यांची तिसरी पत्नी ही त्यांच्यापेक्षा ३३ वर्षांनी लहान आहे. त्यांच्या या लग्नाची कथा मजेशीर आहे. त्यांच्या नावेद नावाच्या मुलासाठी एक स्थळ आले होते. परंतु नावेदला लग्न करायचे नव्हते. त्यामुळे ते स्थळ परत गेले. परंतु त्या मुलीच्या बहिणीवर नाजिमावर जगदीप यांचे प्रेम जडले. त्यांनी त्या मुलीला विचारले. तिच्या घरचेही तयार झाले आणि दोघांनी लग्न केले. वडिलांच्या या लग्नामुळे जावेद खूप नाराज झाला होता परंतु नंतर सर्व काही ठीक झाले. जगदीप यांना तिस-या पत्नीपासून मुस्कान नावाची मुलगी असून ती आता लवकरच चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार आहे.

८१ वर्षाचे जगदीप यांनी जीवनात चढ-उतारांचा सामना केला आणि आपल्या कुटुंबाला एका चांगल्या स्थानावर नेऊन ठेवले. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते आणि अखेर बुधवारी रात्री त्यांनी शेवटचा श्वास घेतला. अशा हा हरहुन्नरी कलावंताला महाराष्ट्र टुडे परिवाराची भावपूर्ण श्रद्धांजली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button