Featuredमुंबई

इंद्रप्रस्थ बाजार संकुलाला आग; अग्निशमनच्या १४ गाड्या दाखल

मुंबईः बोरिवली पश्चिमेला स्टेशनजवळच्या इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरला मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या १४ बंबगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही मात्र आगीमुळे प्रचंड वित्तहानी झाली आहे.

शॉपिंग सेंटरला आज (शनिवार) सकाळी सहाच्या सुमारास ‘लेव्हल चार’ची आग लागली. इमारतीच्या तळमजल्यावरुन आग सुरू झाली. ही आग पसरत गेली. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. आग लागल्यामुळे शॉपिंग सेंटरमध्ये व्यवसाय करणाऱ्या अनेक दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. माल जळून खाक झाला. प्लॅस्टिक, कापड अशा अनेक प्रकारचा माल एकाचवेळी जळत असल्यामुळे शॉपिंग सेंटरमधून मोठ्या प्रमाणावर धूर येत आहे. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत.

कोरोना संकटामुळे सकाळी सहाच्या सुमारास तुरळक वर्दळ होती त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे पोलिसांना सोपे झाले. मात्र आग पसरत गेल्यामुळे अग्निशन दलापुढचे आव्हान बिकट झाले आहे. आग जास्त पसरून गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी अग्निशमन दल खबरदारी घेत आहे. 

बोरिवलीचे इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटर रेल्व स्टेशनच्या शेजारी आहे. मात्र आग स्टेशनच्या दिशेने पसरली नसल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालेला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून स्टेशन परिसरात आग नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक ती तयारी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याआधी २३ जून रोजी मानखुर्द घाटकोपर लिंक रोड परिसरात स्क्रॅप कंपाउंडला सकाळी सहाच्या सुमारास ‘लेव्हल तीन’ची आग लागली होती. या आगीत भंगारात जमा झालेल्या वस्तू आणि तेलाचे डबे जळून खाक झाले होते. मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली होती. यानंतर २५ जून रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास लोअर परळ भागात रघुवंशी मिल कंपाउंड परिसरात ‘लेव्हल तीन’ची आग लागली होती. या आगीमुळे मोठी वित्तहानी झाली होती. आता बोरिवलीत शॉपिंग सेंटरच्या आगीमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.स्वामी विवेकानंद मार्गावर असलेल्या इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरला आग लागल्यामुळे रस्त्यावरच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पोलिसांनी वाहतूक मार्गात थोडा बदल केला आहे. नागरिकांना मॉलपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

आग लागण्याचे कारण शोधण्यासाठी तसेच या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी करायचे उपाय जाणून घेण्याकरिता चौकशी होणार आहे. मुंबईत मागील काही दिवसांत सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणावर आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. आगीत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी होत आहे. आधीच कोरोना संकटामुळे व्यापारी अडचणीत असताना आगीमुळे नवे संकट भेडसावत आहे. यावर उपाय म्हणून व्यावसायिकांची जनजागृती करुन आग लागू नये यासाठी जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक उपाय करण्याची मागणी होत आहे. 

 

 
 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button