सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; महाराष्ट्र सरकारला आत्मचिंतनाची गरज : देवेंद्र फडणवीस
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. यालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला आत्मचिंतनाचा सल्ला दिला आहे. न्यायव्यस्थेवर विश्वास वाढवणारा हा निर्णय असल्याचंही फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान बिहारमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर बिहार पोलीस विरुद्ध मुंबई पोलीसच नव्हे तर दोन्ही राज्यांतील सरकारमध्येही संघर्षमय वातावरण निर्माण झालं. या प्रकरणाशी संबंधित सर्व पक्षांची बाजू ऐकून सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा निर्णय !
या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आणि त्यांच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा ! #CBI #SupremeCourt— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 19, 2020
पाटणा येथे दाखल झालेला एफआयआर सर्वसमावेशक असल्याचे सुप्रीम कोर्टाने यावेळी सांगितले. सुशांतच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदविण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही खटल्यांचा तपास सीबीआयने करावा, असेही निर्देश कोर्टाने दिले. त्याचप्रमाणे या तपासात सीबीआयला मदत करण्याचे आदेश कोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने निर्णयाविरोधात दाद मागण्यासंबंधी विचारणा केली. मात्र कोर्टाने त्यासाठी नकार दिला.


