रेमडेसिवीरची प्रचंड टंचाई आणि काळाबाजार, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा कोरोना स्थितीत निर्माण होणाऱ्या वैद्यकीय गैरसोयीबाबत आज (२ ऑक्टोबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. राज्यात रेमडेसिवीरची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत, असे सांगत देवेंद्र फडणवीसांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत खाजगी आणि सरकारी रुग्णालयात रेमडेसिवीर हे औषध मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
देवेंद्र फडणवीस आपल्या पत्रात म्हणतात की, “राज्यात दर दिवशी सरासरी सुमारे 20 हजार कोरोना रुग्णांची भर पडते. दररोज सरासरी 450 ने बळीसंख्या वाढते आहे. अशात रेमडेसिवीर हे उपचारातील एक महत्वाचे औषध असल्याने त्याचा पुरवठा सुरळीत राहील आणि हे सुनिश्चित करणंदेखील आवश्यक आहे. पण अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची उपलब्धता नसल्यानं गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्य सरकार उपलब्धतेचे कितीही दावे करत असले तरी रूग्णालयांकडून मात्र टंचाईचेच कारण रूग्णांना सांगितले जात आहे. त्यामुळे रुग्णालयांकडून रूग्णांना थेट केमिस्टकडे ते खरेदी करण्यासाठी जाण्यास सांगितले जात आहे. याची किंमत लक्षात घेता, ते सामान्यांच्या आवाक्यात नाही. परिणामी त्यांचा मृत्यू होण्याचंही प्रमाण वाढले आहे.”
“रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी राज्य सरकारने मध्यंतरी प्रक्रिया राबवली होती. पण ती प्रक्रिया सदोष असल्याने अनेक जिल्ह्यातून खरेदी केलेला औषध साठा परत करावा लागला, असे वृत्त माध्यमांमध्ये आले आहे. रेमेडिसीवीर अभावी रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत”, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
“खरेदी योग्य झाली नसल्याने याच्या उपलब्धतेचा गुंता आणखी वाढला. यामुळे रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू झाला. यामुळे गरीबांचे सर्वाधिक हाल होत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अनेकांनी तर याचा गोरखधंदा सुरू केला आहे. एकिकडे गरीब रूग्णांचे मृत्यू आणि दुसरीकडे रेमडेसिवीरची काळाबाजारी ही स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे नवीन खरेदी प्रक्रिया राबवून जिल्हा प्रशासनांना हा साठा तातडीनं उपलब्ध करून देण्यात यावा. इतकंच नाही तर सर्व गरीब रुग्णांना सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात सुद्धा रेमडेसिवीर मोफत उपलब्ध करून देण्यात यावे. याबाबत तातडीने आपण निर्देश प्रशासनाला द्यावेत आणि गरीब रुग्णांचे प्राण वाचवावे”, अशी मागणी फडणवीसांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.
