मुंबई : भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंचा उपयोग हा राज्याच्या भल्यासाठी करुन घ्यावा, विरोधकांवर टीका करण्यासाठी करु नये, असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. नाथाभाऊ जर तिथे गेले तर त्यांचा उपयोग अशा कामासाठी न करता, ते ज्येष्ठ आणि अभ्यासू कार्यकर्ते आहेत. त्यांचा उपयोग या राज्याच्या भल्यासाठी करावा. नाथाभाऊंचा उपयोग विरोधकांवर तोफ डागण्यासाठी करुन घेऊ नये. त्यांचा उपयोग भल्यासाठी करुन घ्यावा, असे रावसाहेब दानवे म्हणाले.
कोणाच्या रोखल्याने कोणी रोखलं जात नसतं. 2019 च्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे, असे वाटते भाजपलाही अशापद्धतीने काही मोठे नेते फोडून नुकसान पोहोचवता येत का, असा त्यांचा प्रयोग सुरु आहे. ते आता सरकारमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या जाण्याने आमच्या नेत्यांवर, विरोधी पक्षनेत्यांवर किंवा पक्षातील अध्यक्षावर काही परिणाम होईल अस काही नाही, असेही दानवे म्हणाले. आमच्या सरकारमध्ये पारदर्शक काम झाली आहेत. कुणी कितीही आरोप केला तरी त्याचा परिणाम आमच्यावर होत नाही. आम्हाला उत्तर महाराष्ट्राची चिंता नाही. पण नाथाभाऊ गेल्याचं दु:ख आहे, असेही दानवे म्हणाले .
नाथाभाऊ हे मूळचे राष्ट्रवादीचेच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एस काँग्रेसची स्थापना केली होती. त्यात नाथाभाऊ होते. त्यावेळी पवारांना नागपूर ते पंढरपूर दिंडी काढली होती. त्यातही नाथाभाऊ होते, असा दावा दानवे यांनी केला. मी आणि नाथाभाऊ भाजपमध्ये सीनियर आहे. त्यामुळे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, एकनाथ खडसे आदी आम्हा सर्वांना एकमेकांची वाटचाल माहीत आहे, असेहो दानवे म्हणाले .
राजकारणात पक्ष सोडण्याच्या घटना घडत असतात. अनेक नेते अनेक वर्षे पक्षात राहून नंतर पक्ष सोडतात. नाथाभाऊंनी सत्ता भोगली. पदं भोगली आणि 40 वर्षानंतर पक्ष सोडला. त्यांनी पक्ष सोडू नये असे वाटत होते.
