लोकल सुरू केल्यास गर्दी घातक ठरेल; मध्य रेल्वेचा राज्य सरकारला इशारा
मुंबई : सर्वसामान्यांनाही लोकलच्या प्रवासाला मुभा द्यावी, असे पत्र राज्य सरकारने रेल्वे विभागाला दिले आहे. या पत्राला मध्य रेल्वेकडून उत्तर देण्यात आलं आहे. लोकल सुरू केल्यास सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अवघड जाईल. शिवाय लोकल सुरू केल्यास रेल्वे फलाटावर होणारी गर्दी धोकादायक ठरेल, असा इशारा मध्य रेल्वेने राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात दिला आहे. लोकल सुरू करण्याबाबत मध्य रेल्वेनेही राज्य सरकारला पत्रं लिहून काही मुद्द्यांकडे सरकारचं लक्ष वेधल्याचं मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी सांगितलं.
या पत्रात मध्य रेल्वेने लोकल सुरू केल्यास निर्माण होणाऱ्या अडचणींचा पाढाच वाचला आहे. लोकल सुरू केल्यास सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं हे आव्हानच ठरणार आहे. सर्वांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी प्रवासाची रूपरेखा ठरवावी लागणार. मध्य रेल्वेत लोकलच्या १७७४ फेऱ्या करण्यात येत होत्या. कोरोना काळात आता या फेऱ्या ७०६ करण्यात आल्या आहेत. कोरोनापूर्वी दिवसाला ४५ लाख प्रवासी होते. एका ट्रेनमध्ये एका फेरीत साधारण २,५०० जण प्रवास करायचे. कोरोना काळात आता ७०० प्रवासी प्रवास करत असून दिवसाला रोज ४ ते ५ लाख प्रवासी असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरू केल्यास फलाटावरची गर्दी घातक ठरेल, असं रेल्वेनं या पत्रात नमूद केल्याचं सूत्रांनी सांगितलं. कोरोनापूर्वी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ३५ ते ४० लाख प्रवासी प्रवास करायचे.
सर्व लाईनवर एकूण ८० लाख प्रवासी प्रवास करायचे. यातील ५० टक्के प्रवाशांनाही प्रवासाची परवानगी दिली तर सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल का? हा मोठा प्रश्न असल्याचं या पत्रातून सांगण्यात करण्यात आलं आहे. रेल्वेतील गर्दी टाळण्यासाठी सरकारी आणि खासगी कार्यालयातील कामाच्या वेळा बदलण्याची सूचनाही रेल्वेने पत्रातून केल्याची माहितीही पुढे आली आहे.